(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bypoll election : वंचितचा अपक्ष राहुल कलाटेंना पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी वाढवली महाविकास आघाडीची धाकधूक
वंचितने पोटनिवडणुकीच्या पाठिंब्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी अपक्ष आमदार राहुल कलाटे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. प्रसिद्धीपत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.
Pune Bypoll election : चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. यात सर्व पक्षीयांचं लक्ष वंचित बहूजन आघाडी कोणाला पाठिंबा देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वंचितने पोटनिवडणुकीच्या पाठिंब्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी अपक्ष आमदार राहुल कलाटे (Rahul kalate) यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. प्रसिद्धीपत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने नेमकं काय म्हटले ?
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दुरदृष्य प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा असे विनंती पत्र आलेले नाही आणि म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.
राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पहाटेच्या शपथविधी नंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहाटेच्या शपथविधी संदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर जाणार नाही असा कुठेही खुलासा केलेला नाही.
'राहुल कलाटेंना 2019 मध्येही दिला होता पाठिंबा'
पिंपरी चिंचवडमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता. आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे हे शिवसेनेचे सभागृहाचे नेते आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. मात्र तसे घडले नाही,असं वंचित बहुजन आघाडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
विचारपूर्वक पाठिंब्याचा निर्णय
गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचार करून भाजपाला पिंपरी चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटे थांबवू शकतात या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड मधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वंचितने राहुल कलाटेंना पाठिंबा देत महाविकास आघाडीला चांगलाच धक्का दिला आहे. राहुल कलाटे यांना वंचितचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीची चिंचवडमध्ये चांगलीच धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.