पुणे : 'एक गाव भोसरी, दहा गाव दुसरी' अशी एक म्हण पुण्यात प्रसिद्ध आहे. या म्हणीला साजेसं राजकारण भोसरी गावात सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेत सध्या 'शेंडीचं राजकारण' सुरु आहे. भाजप संलग्न विद्यमान आमदाराला चितपट करण्यासाठी विधानसभेच्या एका इच्छुक उमेदवाराने शेंडी वाढवली आहे. या आमदारांचा पराभव करुनच वाढवलेली शेंडी कापणार असल्याची भीष्मप्रतिज्ञा या उमेदवाराने केली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले हे उमेदवार म्हणजे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आहेत. विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. परंतु ज्यांना चारीमुंड्या चित करायचं आहे, त्या आमदार लांडगे यांनीदेखील शेंडी वाढवलेली आहे. म्हणूनच सध्या भोसरी विधानसभेत शेंडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये वाढवलेली शेंडी आणि एकमेकांना लावली जाणारी शेंडी या दोहोंचा भाग आहे.

विद्यमान आमदार महेश लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता सानेंची पूर्वी घनिष्ठ मैत्री होती. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांच्याविरोधात महेश लांडगे यांनी बंडखोरी केली. तेव्हा साने यांनी लांडगे यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

त्यावेळी लांडे यांचा पराभव करण्यासाठी साने आणि लांडगे या दोघांनीही शेंडी ठेवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर वाढवलेली शेंडी कापली. परंतु आमदाराच्या खुर्चीवर बसताच लांडगे यांनी 'शेंडी' लावल्याचे साने खुलेआम म्हणू लागले. परिणामी साने आणि आमदार लांडगेंमध्ये चांगलंच विस्तव पेटलं. म्हणूनच या विधानसभेत लांडगेंना इंगा दाखवायचा सानेंनी चंग बांधला आहे.

लांडगेंना पराभूत करण्यासाठी साने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकिटाची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु दुसरीकडे आमदार महेश लांडगे यांनीदेखील यावेळी शेंडी वाढवली आहे. लांडगे यांच्या शेंडी वाढवण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

लांडगे यांनी वाढवलेली शेंडी आणि सानेंनी दिलेले आव्हान यावर तूर्तास तरी बोलणं टाळलं आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन ते चार महिने बाकी आहेत. परंतु त्याआधीच शहरात शेंडीवरून राजकारण पेटलं आहे. दरम्यान कोणाची 'शेंडी' कोणावर भारी पडणार हे निकालातून स्पष्ट होईल.