पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही अटी घालून पुणे सत्र न्यायालयाने पुनाळेकर यांचा जामीन मंजूर केला आहे. सीबीआय ऑफिसला सोमवार आणि गुरुवारी हजर राहणे, परवानगीशिवाय परदेशवारी नाही, साक्षीदारावर दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर राहावे, अशा अटी कोर्टाने पुनाळेकर यांना घातल्या आहेत.

आरोपी शरद कळसकरला पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप पुनाळेकर यांच्यावर आहे. दरम्यान, पुरोगाम्यांच्या दबावापोटी सरकारने पुनाळेकर यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप सनातनने केला आहे. दरम्यान आपण पुनाळेकरांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे सनातनने सांगितलं आहे.

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे, असे तीन आरोप आहेत. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत केली होती.

संजीव पुनाळेकर दाभोलकर आणि पानसरे हत्याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींचे वकीलपत्र घेऊन न्यायालयात बाजू मांडत आहेत. तसेच पुनाळेकर या प्रकरणातील फरार आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय सीबीआयला आहे.

दाभोलकरांवर गोळीबार केला, शरद कळसकरची कबुली | एबीपी माझा