पुणे : मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात (Amit Thackeray Dhadak Morcha Pune ) आलेल्या धडक मोर्चातील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) मुख्य इमारतीकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळ रोखून धरलं त्यानंतर मनसेच्या फक्त शिष्टमंडळाला आत जाऊन कुलगुरू सुरेश गोसावी आणि विद्यापीठ प्रशासनाची भेट घेता येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. विद्यापीठाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो विद्यार्थी आणि कार्यकर्ते जमले. विद्यापीठ चौकात हा मोर्चा शांततेत पार पाडावा, असं आवाहन अमित ठाकरेंनी केलं त्यानंतर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोहोचला आणि अमित ठाकरे आणि कार्यकर्त्यांनी मुख्य इमारतीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यापीठात्या मुख्य इमारतीजवळ कार्यकर्त्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला.
कार्यकर्त्यांना मज्जाव केल्यानंतर पोलिसांनी अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना कुलगुरूंच्या कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी पाठवण्यात आलं. पुणे विद्यापीठात कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यांच्याकडून विविध घोषणा दिल्या जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.
मोर्चातील प्रमुख मागण्या कोणत्या?
-विद्यापीठात शिकणाऱ्या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी.
- परदेशात किंवा परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी आणून देण्याची प्रक्रिया बंद करावी.
-अनेक महाविद्यालयांच्या संकेतस्थळ अद्यावत नसून, त्यावर फारच त्रोटक माहिती आहे. अशा सर्व महाविद्यालयांना सूचना देऊन, संकेतस्थळ अद्यावत करून, त्यावर महाविद्यालयाच्या संबंधित सर्व माहिती प्रकाशित करण्याच्या सूचना द्याव्या.
- नगर आणि नाशिक उपकेंद्राचे काम पूर्ण करून, तेथे तातडीने रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करावेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला कोणतीही अडचण आल्यास किंवा त्याला शैक्षणिक कागदपत्रांची गरज भासल्यास ते तेथून उपलब्ध व्हावे. संबंधित विद्यार्थ्याला पुण्यात येण्याची गरज भासू नये.
-राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठाने या भागातील विद्यार्थ्यांची सीएसआर माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची; तसेच एकवेळ जेवणाची सोय करण्यासाठी पावले उचलावीत.
-विद्यापीठाने 111 जागांसाठी प्राध्यापक भरती सुरू केली आहे. ही भरती पारदर्शी पद्धतीने पार पाडावी आणि गुणवत्त उमेदवारांना न्याय मिळावा. या भरतीवर ठराविक व्यक्ती किंवा संघटनेचे वर्चस्व असू नये. असे झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल.
इतर महत्वाची बातमी-
Amit Thackeray Dhadak Morcha Pune : पुण्यातील वाहतूक कोंडीचा अमित ठाकरेंना फटका; धडक मोर्चा लांबला!