पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनाच पुण्याच्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मनविसेतर्फे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) मोर्चा काढण्यात येत आहे. साधारण 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र रोज प्रमाणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आणि अमित ठाकरे वाहतूक कोंडीत अडकले होते.
पुण्यातील डब्ल्यू मॅरीऑट हॉटेल चौक, सेनापती बापट मार्ग, चतु:श्रुंगी मंदिर पायथा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चामुळे पुण्यातील महत्वाच्या विद्यापीठाच्या रत्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यावर ढोल-ताशा लावून अमित ठाकरे यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले आहे. मात्र याच परिसरात बारावीच्या परीक्षेचं परीक्षाकेंद्र आहे. त्यामुळे मोठा आवाज करु नका, परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि हा मोर्चा शांतपणे पुढे न्या, असं आवाहन अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
वाहतूक कोंडीत भर
पुण्यतील विद्यापीठ चौकात तीन मोठे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात कायमत वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना रोज त्रास सहन करावा लागतो. मात्र आज याच रत्यावर मनसेचा हा मोर्चा काढण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित
पुण्यातील या मनविसेच्या अमित ठाकरेंच्या नेतृत्वात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोर्चा काढण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मनसे आक्रमक झाली आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चेत सहभागी झाले आहेत. शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत शिवाय विद्यापीठातील विद्यार्थीदेखील यात सहभागी झाले आहेत. त्यासोबतच राज ठाकरे यांच्या पत्नी आणि अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरेंनीदेखील या मोर्च्यात उपस्थिती लावली आहे.
मागण्या कोणत्या?
विद्यापीठात शिकणाऱ्या साधारण हजार विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी.परदेशात किंवा परराज्यात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ट्रांस्क्रिप्ट अशा कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे लवकर मिळण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी विद्यार्थी सुविधा केंद्रातील सर्व सुविधा संपूर्णपणे ऑनलाईन कराव्यात. अर्जाच्या हार्ड कॉपी आणून देण्याची प्रक्रिया बंद करावी, अशा अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.