पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांना पोलिसांकडून वाढदिवसाच्या खुलेआम शुभेच्छा देण्याच्या घटना काही नव्या नाहीत. आता ही पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांना काही पोलिसांनी फ्लेक्सबाजी करुन शुभेच्छा दिल्या आहेत. गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड या विद्यमान स्थायी समितीच्या अध्यक्षा आहेत. महापालिकेच्या आर्थिक नाड्या पत्नीच्या हाती असलेल्या विनायक यांचे 16 ऑगस्टच्या वाढदिवसानिमित्त शहरभर फ्लेक्स लागले आगेत. पण यापैकी पोलिसांनी शुभेच्छा दिलेल्या फ्लेक्सवर अनेकांनी आक्षेप घेतला आहेत. अशा शुभेच्छा देऊन पोलिसांना यातून नेमका काय संदेश द्यायचाय असा प्रश्न ही विचारला जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर 2012 साली पहिल्यांदा नगरसेवक झालेले विनायक गायकवाड भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे खंदे समर्थक आहेत. म्हणूनच 2017 साली ते भाजपच्या गंगेत नाहून निघाले. महापालिका 2017च्या निवडणुकीत स्वतःच रिंगणात उतरायची इच्छा होती, मात्र महिला आरक्षण पडल्याने पत्नी ममता यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आले. तेव्हाही गायकवाड यांच्या गुन्ह्यांची चर्चा सर्वत्र रंगली होती. विनायक यांचे वडील हे निवृत्त पोलिस कर्मचारी असून त्यांचे भाऊ हे सध्या पोलिस दलात कार्यरत आहेत.

तरुण वयातच लाईन बॉयपासून कार्याला सुरुवात करणाऱ्या विनायक गायकवाड यांनी चायनीजचं हॉटेल सुरु केलं होतं. तेव्हापासून छोटे-मोठे गुन्हे करणाऱ्या विनायक यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

विनायक गायकवाडवरील गुन्हे
- 2006 साली हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये मारहाण आणि शिवीगाळची तक्रार
- 2007 साली पूर्वीच्या चतुश्रुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हत्येचा गुन्हा
- 2008 साली शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात निर्दोष मुक्तता
- 2011 सालच्या दंगलीप्रकरणी हिंजवडी हद्दीत गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्याय प्रविष्ट
- चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई

मात्र या गुन्ह्यांमधून निर्दोष सुटल्याचा दावा ते नेहमीच करतात. असं असलं तरी त्यांची पार्श्वभूमी पाहता पोलिसांनी त्यांना खुलेआम शुभेच्छा देणं कितपत योग्य आहे. त्यातच हा फ्लेक्सही अनधिकृत आहे. आता यानिमित्ताने कालच कामकाज सुरु केलेल्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या पोलिसांवर कारवाई करुन, ते अशा गोष्टींना थारा देणार नाही हे दाखवून द्यावं.