पुणे : नक्षली सहभागाच्या संशयावरुन एल्गार परिषदेशी संबंधित काही जणांच्या घराची पुणे पोलिसांकडून झडती सुरु आहे. पुण्यातील एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता हैदराबाद, मुंबई, दिल्ली, हरियाणा, रांची या शहरांमध्ये झाडाझडतीला सुरुवात केली.
पुणे पोलिसांच्या सहा पथकांकडून देशातील मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची, गोवा आणि हरियाणा या शहरांमध्ये आज सकाळपासून माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या संशयितांवर कारवाई सुरू आहे.
यामध्ये हैदराबादमध्ये माओवादी नेता आणि कवी वारावर राव यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरु आहे. मुंबईमध्ये अरुण फरेरा आणि व्हर्नोन गोन्सालवीस यांच्या घरांची झाडाझडती घेतली जाते आहे.
दिल्लीमध्ये गौतम नवलखा यांच्या घरात तपास सुरु आहे. तर सुधा भारद्वाज यांच्या रांचीमधील घरी पोलिसांची कारवाई सुरु आहे. तिकडे गोव्यात आनंद तेलतुंबडे यांच्या घरी पुणे पोलिस चौकशी करत आहेत.
हे सर्वजण माओवाद्यांसाठी शहरी भागात थिंक टँक म्हणून काम करत होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. यापैकी काही जण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत जे लोक सहभागी झाले होते, त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे. या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते, असं पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकांनी देशभरात विविध ठिकाणी छापे मारले आहेत.
याआधी एल्गार परिषदेशी संबंधित शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या माहितीवरुन आज हैदराबाच्या वारावर राव आणि क्रांती, मुंबईचे वरनॉन गोन्साल्विस आणि अरुण परेरा, छत्तीसगडच्या सुधा भारद्वार, रांचीच्या स्टॅनी स्वामी तसंच गौतम नवलखा यांच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली.
कोरेगाव-भीमामध्ये काय घडलं होतं?
कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 1 जानेवारीला विजय दिवस साजरा करण्यात आला. कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
कुणावर गुन्हे दाखल झाले?
या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसरीकडे, एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता.