पुणे : पुण्यातील खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाची रविवारी (26 ऑगस्ट) रात्री आठच्या सुमारास आमदार गोरे यांच्यासह 10 ते 11 कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. चाकण पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते चाकणदरम्यान मागील महिनाभरापासून होत असलेली वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नव्हती. अखेर तळेगाव चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी स्वतः सुरेश गोरे रस्त्यावर उतरले होते. वाहनं मार्गस्थ करण्यासाठी गोरे आणि समर्थकांकडून आटापिटा सुरु होता. पण काही केल्या त्यांना वाहतूक सुरळीत करता येत नव्हती. आता रस्त्यावर उतरलोय आणि मध्येच निघून गेलो तर हसं होईल. म्हणून अखेर त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर राग काढायला सुरुवात केली. त्यांची तोडफोड करत कायदा हातात घेतला.
सुरेश गोरे आणि कार्यकर्त्यांच्या तोडफोडीनंतर अवैध प्रवासी वाहनं चालवणाऱ्यांनी वाहनांसह तिथून पोबारा केला. त्यातच गुन्हा दाखल करु नये म्हणून वर शिरजोर सुरुच होता. त्यातून एकाने पुढे येऊन सोमवारी तक्रार दाखल केली. त्यानंतर आमदार गोरे यांच्यासह चाकणमधील 10 ते 11 विद्यमान नगरसेवकांवर काल (27 ऑगस्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. आता चाकण पोलिस यात कसा तपास करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अवैध प्रवासीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांना वारंवार सांगूनही कारवाई केली नाही. अखेर चौकात जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतरच शिक्षांची तोडफोड केली, असं स्पष्टीकरण आमदार सुरेश गोरे यांनी दिलं आहे.