पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांनी केलेल्या गैरव्यवराहात मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक केली. मात्र पोलिसांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना घाई केल्याचं समोर आलं आहे. हीच घाई पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.


पुणे पोलिसांनी स्वत:च्या अधिकारात ‘MPID’ कलमाखाली कारवाई केली. मात्र एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षाविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी पोलिसांना रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बंधनकारक होते. पण पोलिसांनी तसं काही केलं नाही. त्यामुळे या प्रकरणाता पोलिसांच्या समस्या वाढू शकतात.


याशिवाय पुणे पोलिसांनी ही कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी महासंचालक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनाही अंधारात ठेवल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात डीएसके यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून, बँकेचा त्याच्याशी संबंध नाही. तसेच कर्जाची वसुली प्रक्रियाही सुरू होती.


राज्यस्तरीय बँक समितीचे समन्वयक म्हणून रवींद्र मराठे यांनी सतत सकारात्मक भूमिका घेतली असताना थेट या बँकेवरच कारवाई करताना त्याचे बँकिंग व्यवसायावर काय परिणाम होतील, तसेच बँकेच्या पदाधिकाऱ्याचा या घोटाळ्याशी थेट संबंध आहे का याची खातरजमा पोलिसांनी न केल्याचं सांगण्यात येत आहे.


बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांसह सहा जणांवर कारवाई
बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या प्रकरणात बुधवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या चार अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाराचा गैरवापर करत नियम डावलून डीएसकेंच्या नसलेल्या कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका या बँक अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.


आरोपींमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांचाही समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र बँकेचे तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन एस देशपांडे, बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर के गुप्ता, डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यांचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर, डी एस कुलकर्णी यांचे सीए सुनील घाटपांडे यांना आज अटक झाली आहे.