पिंपरी चिंचवड : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंधात कटुता निर्माण झालेली असली, तरी 'फजली' आंब्यांच्या निमित्ताने भारतीय पाकिस्तानचा गोडवा चाखत आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेला हा आंबा ग्राहकांच्या पसंतीलाही उतरला आहे.

फजली आंबा.... ऐन पावसाळ्यात पिंपरी चिंचवडच्या बाजारात अवतरलेला हा आंबा पाकिस्तानातून आला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हा आंबा बहरतो, जेव्हा भारतातील आंब्याचा मौसम संपतो तेव्हा पाकिस्तानचा हा फजली चाखण्यासाठी तयार असतो. हा आंबा पाकिस्तानातून देश विदेशात निर्यात केला जातो, भारतीयांच्या नशिबीही तो आला आहे.

स्वातंत्र्यापूर्वी भारत-पाकिस्तान एकच होतं. आता ते वेगळे झाले तरी माती मात्र तीच आहे. त्यामुळे आंब्यांचा स्वाद वेगळा नाही आणि तो चाखायला हरकत नसावी, असं म्हणत ग्राहकांनी फजलीला पसंती दिली आहे.

भारत-पाकिस्तान या देशांतील राजकीय समीकरणं सर्वश्रुत आहेत. इतकंच काय तर खेळाच्या मैदानातही दोन्ही देशाच्या खेळाडूंप्रमाणेच प्रेक्षकांमध्येही जंग पाहायला मिळते. फजली आंबा मात्र याला अपवाद ठरला आहे. या आंब्यांचा जसा गोडवा आहे, तसाच तो पाकिस्तानी विचारात ही रुजावा, इतकंच.