पुणे : मेट्रोमोनी साईटवरून एक-दोन नव्हे तर तब्बल 255 हून अधिक तरूणींना गंडा घालण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केलीय. वाकड पोलीस ठाण्यात दोन युवतींनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे.


पोलिसांनी अटक केलेल्या या दोन भामट्यांनी अनेक तरूणींना जाळ्यात ओढत त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींपेक्षा जास्त रक्कम लाटली आहे. हे युवक पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खोट्या नावाने राहत होते. तेथूनच देशभरातील अनेक तरूणींसोबत संपर्क साधत असत. केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याचे सांगून काही दिवसांनी मुलींकडे पैशांची मागणी करायचे. 


या दोन्ही संशयीत आरोपींकडून पोलिसांनी खोटे आधारकार्ड, खोटे केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याचे ओळखपत्र, महागडे मोबाईल, महागड्या गाड्या असा 75 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. 


पोलिसांच्या प्राथमिक तपासात या संशयीतांनी पुण्यातील 91, बंगळुरू येथील 142 आणि गुरंगाव येथील 22 अशा जवळपास 255 मुलींची एकूण दीड कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान हा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याचे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. 


मॅट्रिमोनियल साईट्सचा सुळसुळाट
अलिकडे धकाधकीच्या काळात समाजामध्ये वावरण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांना लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधणे कठीण झाले आहे. याचाच फायदा घेत अनेक मॅट्रिमोनियल साईट्सचा सुळसुळाट झाला आहे. अनेकजण मॅट्रिमोनिअल साईट्सवर नावे नोंदवून आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचाच फायदा घेत अनेक तोतया आपले उखळ पांढरे करून घेतात. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या या दोघांनीही असेच प्रकार करून तरूणींना गंडा घातलाय.  


महत्वाच्या बातम्या