पिंपरी चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचित आहे. रोखठोक आणि परखड मतं ते कायमच मांडत असतात. याचा प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा आला. पोलिसांना अत्याधुनिक बाईकचं वितरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रातिनिधिक चावी पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांना देण्यात आली. त्यावेळी मंचावर आलेल्या पोलीस उपायुक्तांची प्रकृती पाहून अजित पवारांनी त्यांना एक सल्ला दिला. 'बारीक व्हा... बारीक व्हा', असा सल्ला अजित पवारांनी पोलीस उपायुक्तांना दिला.


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधिक चावी स्वीकारण्यासाठी आले होते. यावेळी चावी देता ना अजित पवारांनी त्यांच्याकडे पाहून सर्वांसमोरच 'बारीक व्हा' असा सल्ला दिला.


अजित पवार यांचा रोखठोक स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. सोबतच शारिरीक तंदुरुस्तीच्या बाबतीतही ते जागरुक असतात. अजित पवार हे 62 वर्षांचे आहेत. पण अजित पवारांकडे पाहून त्यांनी साठी पार केली यावर कोणाचाही विश्वास बसणार नाहीत. त्यामुळेच आज पिंपरी चिंचवडमधील कार्यक्रमात पोलीस उपायुक्तांना पाहिल्यावर अजित पवार यांनी सर्वांसमोरच त्यांना बारीक होण्याचा सल्ला दिला. यावेळी मंचावर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे देखील होते.


अनफिट पोलिसांना कानपिचक्या
काही महिन्यांपूर्वी मुंबईतील कार्यक्रमात अजित पवार यांनी अनफिट पोलिसांना कानपिचक्या दिल्या होत्या. मुख्यमंत्र्यांसारखं सडपातळ आणि स्मार्ट असलं पाहिजे; असं अजित पवार म्हणाले होते. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना फिटनेसच्या मुद्द्यावरु अजित पवार म्हणाले होते की, पोलिसांची शारीरिक क्षमता चांगली असायला हवी. या कारणामुळे पोलिसांची बदनामी व्हायला नको. पोलीस शिपायांकडे पाहिल्यावर अनेकदा मनात विचार येतो की, उद्या एखाद्या गुन्हेगाराच्या पाठी पळायचं झालं तर यांना पळता येईल का? एवढी शंका येण्याइतपत काही पोलीस कर्मचाऱ्यांची पोटं सुटलेली असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहा. ते कसे सडपातळ दिसतात, आमची तरी पोटं सुटलेली आहेत. पण पोलिसांनी स्मार्ट असलं पाहिजे. जेणेकरुन गुन्हेगारांवर वचक राहिल."


अग्निशमन दलाला फायर फायटर बाईक प्रदान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाला फायर फायटर बाईक प्रदान केल्या. या सहा अत्याधुनिक फायर बाईक दाट लोकवस्ती, चिंचोळ्या गल्लीतील आगीवर तातडीने नियंत्रण मिळवू शकतात. छोट्या आगीचे रुपांतर मोठ्या आगीत होऊ नये, म्हणून या बाईक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या फायर बाईकला दोन्ही बाजूंनी पाण्याची टाकी, शिवाय वाहतुकीतून मार्ग काढण्यासाठी सायरन आहे.