Pune News Updates पुणे : नोकरी म्हटलं की सुट्ट्या आल्याच. सुट्ट्या घेण्याची वेगवेगळी कारणं असतात. कुणी लग्नासाठी सुट्टी घेतं, कुणी आजारी असल्यामुळं सुट्टी घेतं. खाजगी असो वा सरकारी कर्मचारी असो सुट्ट्या घेण्यासाठी त्यांना आपल्या बॉसची परवानगी मात्र घ्यावीच लागते. सुट्ट्यांच्या कारणांबाबतचे काही किस्से आपण याआधी ऐकले असतील. आता मात्र पुण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या (Pune Police Constable) सुट्टीसंदर्भातील पत्राची जोरदार चर्चा आहे. पोलिस कर्मचाऱ्यानं आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Police Officer) लिहिलेलं हे पत्र असून या पत्रात गावाकडून मासे आणायला जाण्यासाठी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 


काय आहे नेमकं पत्रात 


सुट्टी मिळण्यासाठी काय पण! असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं हे पत्र आहे. खडक पोलिस ठाण्यातील कर्मचारी एस डी शिंदे यांच्या नावानं हे पत्र आहे. शिंदे यांनी सुट्टी मिळावी यासाठी हटके स्टाईलमध्ये आपल्या वरिष्ठांना पत्र लिहिलं असल्याचं दिसतंय.  आपल्या सहकाऱ्यांना चिलापी आणि रव मासे (Chilapi Fish) घेऊन यायचे कारण देत या कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सुट्टी मिळण्याबाबत पत्र लिहिलं आहे. 


पत्र अद्याप आलेलं नसल्याची वरिष्ठांची माहिती 


मासे आणायचे कारण देत 2 दिवस सुट्ट्या द्या असं पत्रात दिलेल्या मजकुरात नमूद करण्यात आलं आहे. या पत्राची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. या पत्राबाबत वरिष्ठ पोलिसांना विचारले असता आमच्याकडे असं पत्र अद्याप आलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं. मात्र हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


चिलापीची क्रेझ भारी
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात चिलापी मासा मोठ्या प्रमाणावर मिळतो. पत्रात सदर कर्मचाऱ्यानं करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावाचा उल्लेख केला आहे. या गावाजवळ उजनीचे बॅक वॉटर येतं. तिथं मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. चिलापी माश्यांसाठी येरमाळा, भिगवण परिसरातील धाबे प्रसिद्ध आहेत.