Pune Crime: रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी आंतराज्यातून दौंड तालुक्यात चोरी करत होती. या सहा जणांच्या टोळीला दौंड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.अनेक दिवसांपासून या सहा जणांच्या टोळीने दौंड परिसरात धुडगूस घातली होती. मात्र अखेर दौंड पोलिसांना त्यांना जेरबंद करण्यात यश आलं आहे.
या टोळीकडून 7 मोबाईल, 48 नवीन सिम कार्ड, बॅग लिफ्टिंगसाठी कटर, ब्लेड, पक्कड,बनावट चाव्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या टोळीतील पाच आरोपी हे हरियाणाचे असून एक आरोपी दिल्लीचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
सहा जणांच्या टोळीने दोंड परिसरात धुमाकूळ घातला होता. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅग चोरी करत होते. बॅग चोरी केल्यानंतर सगळी टोळी फरार होत होती. या टोळीने दौंडमध्येच नाही तर राज्यात धुमाकुळ घातला होता. टोळीत एकूण सहापेक्षा अधिक लोक आहेत. पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांना ही टोळी दौंडमध्ये असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाच्या सहाय्याने दौंड शहरातील गोवा गल्ली, नेहरु चौका या ठिकाणाहून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाबाबत पुढील सगळी करवाई मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील मुंबई भाईंदर युनिट सात यांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
यापुर्वी पुणे पोलिसांनीदेखील अट्टल चोराला जेरबंद केलं होतं. सहा लाख रुपयांचे वाहन चोरी करणाऱ्या अट्टल वाहन चोराला खुळेवाडी विमाननगर परिसरातून अटक केली होती. त्याने चोरलेल्या सहा लाख रुपये किमतीची 13 वाहने जप्त केली होती. चंदन नगर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करणाऱ्याने आरोपीबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरु केला. आरोपी पुण्यातील चंदन नगर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे हलवली. त्यानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक गणेश माने यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पुणे-नगर हायवे पोलीस पथकाने नगर हायवेवर सापळा रचून आरोपीला पकडले होते.