पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्रासह चौघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सिद्धार्थ बनसोडे असं पुत्राचे नाव आहे. सिद्धार्थ बनसोडे रत्नागिरी जिल्ह्यात लपून बसला होता. पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिथून त्याच्यासह चौघांना अटक केली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. मागील पंधरा दिवसांपासून त्याचा शोध सुरु होता.
पिंपरीमध्ये 12 मे रोजी कथित गोळीबाराची घटना घडली होती. महापालिकेचा कंत्राटदार अँथोनीचा मॅनेजर तानाजी पवारने आपल्या दिशेने गोळीबार केल्याचा दावा आमदार अण्णा बनसोडे यांनी केला होता. तर आमदार पुत्रासह कार्यकर्ते जीवे मारत असल्याने बचावासाठी हवेत गोळीबार केल्याचा प्रतिदावा तानाजी पवारने केला होता.
आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदारांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने केला आहे. तसंच या घटनेच्या एक दिवस आधी अँथोनीच्या कार्यलयात घुसून दोन कर्मचाऱ्यांवरही जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातही आमदार पुत्र आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत.
आतापर्यंत आमदार पुत्रासह नऊ समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे. याशिवाय तानाजी पवारला पहिल्याच दिवशी बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या.
संबंधित बातम्या