पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह 21 जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने केला आहे. पण हा संपूर्ण घटनाक्रम आणि समोर येणाऱ्या बाबी पाहिल्या तर आमदारांचे काही दावे फोल ठरताना दिसत आहेत. तर दुसरीकडे तानाजी पवारप्रमाणे आमदार पुत्र आणि समर्थकांना अटक होणार का? हा देखील प्रश्न आहेच.


घटना पहिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला. झाडलेल्या दोन्ही गोळ्यांमधून आमदार सुखरुप बचावले. घटनास्थळी 20 ते 20 कार्यकर्ते उपस्थित होते, त्यापैकी कोणीही जखमी नाही. पालिकेचे कंत्राटदार सिजू अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी एबीपी माझाला दिली. "मी स्वतः तानाजीला बोलाऊन घेतलं होतं, त्यानंतर त्याने एकेरी उल्लेख केला, त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला आणि त्याने माझ्या दिशेने गोळीबार केला, सुदैवाने मी यातून बचावलो," असं आमदार बनसोडे यांनी पोलिसांना सांगितलं. तानाजी हे सीआरपीएफचे निवृत्त जवान असल्याचंही समोर आलं. मग पत्रकार घटनास्थळी पोहोचले आणि कॅमेऱ्यासमोर वरील घटनाक्रम सांगितला. राज्यातील सत्ताधारी आमदारांवर गोळीबार म्हणजे धक्कादायक घटना, बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी तातडीने तानाजीला अटक केली. पण गोळी ना आमदारांना, ना उपस्थितांना लागली मग गोळीची खूण शोधण्याचं काम सुरु झालं. पण काही केल्या पोलिसांना ती खूण सापडत नव्हती. 


घटना दुसरी
आमदार बनसोडे आणि तानाजी पवार यांच्यामधील 11 मे रोजी फोनवरुन झालेल्या संवादाची क्लिप समोर आली. यात आमदार शिवीगाळ करुन तानाजीला धमकावत आहेत. तानाजी मात्र आपण योग्य भाषा वापरावी, असं अनेकदा सांगत होता. परंतु  संतापलेल्या आमदारांनी तू उद्या ये मग बघू, असं त्यात धमकावले. एक मिनिट चाळीस सेकंदाची ही संपूर्ण ऑडिओ क्लिप एबीपी माझाने प्रसारित केली असून वेबसाईटवरील बातमीत त्या क्लिपमधील संपूर्ण संभाषण आहे.


घटना तिसरी
अँथोनी यांच्या आकुर्डी येथील कार्यालयासमोर 11 मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले. यात आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांनी कार्यालयात प्रवेश केला. जमावबंदी कायदा लागू असताना गोंधळ घातला. तानाजी पवार कुठे आहे, ते सांगा असं उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांनी धमकावले. पण माहित नाही, असं म्हणताच दोन कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर खेचण्यात आलं. तिथेच घातक शस्त्राने दोघांवर हल्ला झाला. हे सीसीटीव्हीमधील दृश्यांनी समोर आणलं. या आधारावर आमदार पुत्र सिद्धार्थ, त्यांच्या पीएसह दहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.


तानाजी पवारवर गुन्हा दाखल
आमदार अण्णा बनसोडे आणि मुलगा सिद्धार्थच्या दिशेने गोळीबार झाला. तानाजी पवारसह तिघांनी हा कट रचल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पहिल्या घटनेतील दावे करण्यात आले.


आमदार पुत्र, पीएवर गुन्हा दाखल
तानाजी पवार यांनी देखील पिंपरी पोलिसांनी दोन दिवसांत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिली. यात वरील ऑडिओ क्लिपचा उल्लेख आहे. तर "घटनेच्या दिवशी आमदारांच्या पीएसह दोघांनी माझं अपहरण केलं. तिथून घटना घडलेल्या ठिकाणी मला आणलं. तिथं आमदार स्वतः उपस्थित होते. ऑडिओ क्लिपमधील संवादात मी चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा अशी मी माफी मागितली. तेव्हाच आमदारांचा मुलगा सिद्धार्थने मला कार्यालयातून बाहेर आणलं. त्याच्या हातात घातक शस्त्र होतं, त्याने माझ्या डोक्यावर प्रहार केला. इतरांनी बेल्ट, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत मला रक्तबंबाळ केलं. या मारहाणीत माझा जीव जाण्याची शक्यता होती. म्हणून माझ्याकडे असणाऱ्या बंदुकीतून एक हवेत गोळी झाडली. नंतर तीच बंदूक एकाने माझ्याकडून हिसकावली. नंतर मला एक गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर पोलीस आले आणि मला ताब्यात घेतलं," असा आरोप करत तानाजीने आमदार पुत्र आणि पीएसह 21 जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.


आमदारांचा गोळीबाराचा दावा फोल?
वरील संपूर्ण घटनाक्रम आणि दाखल झालेले गुन्हे पाहता, आमदारांचे दावे फोल ठरत आहेत. एकतर आमदारांनी तानाजीला बोलावलं होतं की त्याचं अपहरण केलं होतं? तानाजीने हवेत गोळी झाडल्याचं तक्रारीत म्हटल्याने आमदारांनी आपल्यावर गोळी झाडल्याचा केलेला दावाही फोल ठरताना दिसत आहे. आता दाखल गुन्ह्यांप्रमाणे तानाजी पवारला अटक करण्यात आली आहे. पण आमदार पुत्र, त्यांच्या पीएसह इतरांना अटक होणार का? राज्यातील सत्तेचे आमदार भागीदार असल्याने पोलीस निःपक्षपातीपणे अटकेची कारवाई करणार का? हे पाहणं आता महत्त्वचं राहिल.