पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बनसोडे यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने एकही गोळी त्यांना लागली नाही आणि ते सध्या सुखरूप आहेत. 


अँथोनी नावाच्या ठेकेदाराच्या सुपरवायझरने हा गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. प्राथमिक माहितीत गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव तानाजी पवार असं आहे. पिंपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार बनसोडे यांच्या कार्यलयाच्या समोर घडल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. पण गोळीबार का केला? हे अद्याप समजलेलं नाही. मीच पवारला बोलवलं होतं, अशी माहिती पोलिसांना अण्णा बनसोडे यांनी दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत. अटकेत असलेले तानाजी पवार हे सीआरपीएफचे निवृत्त जवान आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.


हल्ला झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की; ठेकेदार अँथोनी यांचा  सुपरवायझर तानाजी पवारला गेल्या काही दिवसांपासून आम्ही संपर्क करत होतो. दोन मुलांना कामाला लावण्यासंदर्भात मी संपर्क करत होतो. माझ्या पीएने तानाजी पवारला फोन केला होता. मात्र त्याने बोलताना अरेरावी केली. त्यामुळे मी त्याला बोलावून घेतलं होतं. त्याला समजावून सांगितलं. मात्र त्याने बाहेर जाऊन थेट गोळीबार केला. आमच्या काही वादावादी झाली नाही, मात्र पवारने वाद घातला. तानाजी पवारने गोळीबार केल्यानंतर इथे उपस्थित असलेल्या मुलाने त्याला खाली पाडलं.