पिंपरी चिंचवड : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोन्ही स्वतंत्र घटना आहेत. पहिली घटना रात्री आठच्या सुमारास घडली. यात गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सचिन जाधवांची हत्या झाली. पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यापासून जवळ असलेल्या कोंदेवाडी फाट्यावर या घटनेची सुरुवात झाली. काल रात्री इथं सचिन जाधव यांचे बाळशीराम थिटे आणि विजय सूर्यवंशी यांच्याशी भांडण झालं. जाधव यांनी दिलेले पैसे ते परत करत नव्हते यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद शिगेला पोहोचला होता. यातूनच काल थिटे आणि सुर्यवंशीने त्यांची हत्या केली.


तिथून जाधव यांच्याच गाडीत मृतदेह टाकला आणि गाडी अहमदनगर जिल्ह्याच्या दिशेने नेहली. पुणे जिल्हा संपताच नगर जिल्ह्यातील कोरथन घाट सुरू झाला. तिथं दरीत हा मृतदेह पेटवून दिला आणि गाडी तिथंच जवळपास सोडून दिली. पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा इरादा होता. दुसरीकडे जाधव घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने तपास सुरू झाला आणि आज जळालेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळला. तपासाची चक्र फिरताच थिटे आणि सूर्यवंशी पोलिसांच्या अटकेत आले. 


दुसरी घटना थोरांदळे येथे घडली. इथं द्रौपदाबाई गिरे यांचा मृतदेह डोक्यावर इजा झालेल्या अवस्थेत आढळला. आदिवासी समाजाच्या द्रौपदाबाई मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. पण आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात त्या सध्या वास्तव्यास होत्या. इथंच शेतात राबून उदरनिर्वाह करायच्या. काल रात्री त्यांना एक फोन आला आणि त्या घराबाहेर पडल्या. बराचवेळ त्या घरी परतल्या नाहीत म्हणून शोध घेतला असता, जवळच रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळला. या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शेवटचा फोन कोणी केला त्याचा शोध पोलीस घेतायेत.


गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात रात्रीत दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच नागरिक सुरक्षित आहेत का? खुद्द त्यांच्या कार्यकर्त्याचीच हत्या झाल्याने असे प्रश्न आता उपस्थित केले जातायेत.