पिंपरी चिंचवड:  टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट झाले. तीन स्कूल बसेस जळून खाक झाल्या. अख्ख शहर हादरून गेलं, स्थानिक नागरिक तर भीतीपोटी अक्षरशः घर सोडून बाहेर पडले. अग्निशमन दलाने तासाभरात परिस्थिती नियंत्रणात आणली अन भीषण आगीमागे गॅस चोरीचा गोरखधंदा कारणीभूत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. या गोरखधंद्याला अन् भीषण आगीला पोलिसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संतापलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला.


 पिंपरी चिंचवडमधील हा जीवघेणा गोरखधंदा सामान्यांच्या जीवावर उठला होता. आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेजवळच हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळंच सावंतांनी घटनास्थळी धाव घेत या गोरखधंद्याला अन् भीषण आगीला पिंपरी चिंचवड पोलिसच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. सावंतांनी थेट ससूनमधील ड्रग्स माफियाशीच या घटनेची तुलना केली.


 पिंपरी चिंचवड पोलिसांवर तानाजी सावंत भडकले


गॅस माफियांचा हा हैदोस ससूनमधील ड्रग्स माफियांसारखाच आहे असं म्हणत या काळाबाजाराला अन् त्यामुळं लागलेल्या भीषण आगीला पिंपरी चिंचवड पोलिसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप सावंतांनी केला. जेएसपीएम ही संस्था आरोग्य मंत्र्यांचीच आहे. त्याच संस्थेच्या ब्लॉसम शाळेलगतच्या मोकळया जागेत हा गोरखधंदा सुरू होता. त्यामुळं सावंतांनी घटनास्थळी भेट देत हा दोन नंबरचा धंदा पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू असल्याचा गौप्यस्फोट केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदेंची आरोग्य मंत्र्यांनी चांगलीच खरडपट्टी केली


नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


माहितीनुसार, गॅसच्या टाकीला आग लागल्याने हे मोठे स्फोट झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे या भागात काही काळ गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूच्या सोसायटीत नागरिकांची पळापळ झाली. दरम्यान, या स्फोटामुळे इथले नागरिक घाबरलेले आहेत. स्फोटचा आवाज होताच रात्री अनेक जण रस्त्यावर आले. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही या स्फोटचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.


गॅस चोरीचा गोरखधंदा चव्हाट्यावर


गॅस चोरीच्या काळाबाजारातून भीषण आग लागल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्यात. जागा मालक, चोरीच्या गॅसची विक्री करणारा अन सिलिंडरची अवैद्यरीत्या वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा समावेश आहे. टँकर चालक मात्र अद्याप ही फरार आहे. एकामागोमाग एक नऊ स्फोट झाल्यानंतर गॅस चोरीचा हा गोरखधंदा चव्हाट्यावर आला. पण हा काळाबाजार फक्त इथंच सुरू होता असं नव्हे. राज्यभर हा जीवघेणा प्रकार सुरूच असतो. पण तो पोलिसांच्या नजरेस पडत नाही, हेच मोठं दुर्दैव.


हे ही वाचा :


Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या