पिंपरी-चिंचवड : 21 व्या शतकातही बेटी बचाओ, महिला सबलीकरणाचे नारे आपल्याला द्यावे लागतात. मात्र भौतिक सुखासाठी जन्मदात्यानेच मुलींचे सौदे केले तर मुलींनी पहायचं तरी कुणाकडे? पिंपरीत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.


आई-वडिलांनीच साथ सोडल्यानं हतबल झालेल्या एका तरुणीनं व्हिडिओद्वारे आपली आर्त हाक पोलिसांसमोर मांडली.

पहिल्या पत्नीपासून मुलगा होत नाही म्हणून उस्मानाबादमध्ये शिक्षक असणाऱ्या उत्तम काळेनं थेट पोरीच्या पालकांशीच तिचा सौदा केल्याचा आरोप आहे.

46 वर्षीय उत्तम काळेचं पहिलं लग्न झालं आहे. काळे दाम्पत्याला चौदा वर्षांची एक मुलगीही आहे. पण पहिल्या पत्नीला मुलगा होऊ शकत नसल्याने आणि वंशाला दिवा हवा असल्याने दुसऱ्या लग्नाचा घाट घातला गेला.

यासाठी पिंपरीतील 19 वर्षांच्या तरुणीच्या आई-बापाला पुण्यात एक फ्लॅट आणि डोक्यावरचं कर्ज फेडण्याचं आमिष दाखवलं गेलं. या आमिषाला ते बळीही पडले.मुलीच्या बदल्यात नवा फ्लॅट आणि कर्ज फेडण्याचा करारच काळे कुटुंबीयांनी तरुणींच्या कुटुंबीयांसोबत केला आणि भौतिक सुखाच्या बदल्यात त्यांनी आपल्या मुलीचा बळी दिला.

होणाऱ्या नवऱ्याचं तोंडही पाहिलेलं नसताना टिळा झाला. तरीही विरोध कायम असल्याने तिला डांबून ठेवण्यात आलं. लग्नादिवशी थेट बोहल्यावर चढवण्यासाठी तिला घरातून बाहेर काढलं. उस्मानाबादच्या तेरखेड येथील सासरी ती पोहचली आणि तिथून सुटका करण्याचा तिने चंग बांधला.

व्हिडिओतून महाराष्ट्र पोलिसांना तिने मदतीची याचना केली. उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षकांकडे हा व्हिडीओ पोहचला आणि तिची या जाचातून सुटका झाली. उस्मानाबाद पोलिसांनी तिला पुन्हा आई-बापाच्या स्वाधीन केलं. मात्र पैसे आणि फ्लॅटच्या हव्यासापोटी तिने शिक्षकाशी संसार करावा, हा धोशा आई-बापाने सुरुच ठेवला.

मैत्रिणीच्या मदतीने तिने सांगवी पोलिस स्टेशन गाठलं आणि या विवाहाचं बिंग फुटलं. या प्रकरणी पोलिसांनी पती, आई-बाप यांच्यासह सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी महिलांचा बळी दिला जातोय. यात आई-वडिलांनीही मुलींना वाऱ्यावर सोडलं, तर लेकींनी पहायचं कोणाकडे?