पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्षीदार पूजा सकट नावाच्या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. कोरेगाव-भीमापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडा गावातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला.
दोन दिवसआधी पूजाच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला हिंसाचार झाला होता. जाळपोळ आणि दगडफेकही झाली होती. या हिंसाचारात पूजा सकटचं घर जाळण्यात आलं होतं. हिंसाचाराच्या त्या घटनेची पूजा साक्षीदार होती.
घर जाळल्यानंतर पूजाचं कुटुंब कोरेगाव-भीमापासून जवळच असलेल्या वाडा नावाच्या गावात राहायला गेलं. मात्र वाडा गावात ज्या ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, तिथल्या जमीन मालकाने काही दिवसांमध्येच घर सोडण्यासाठी तिच्या कुटुंबाच्या मागे लकडा लावला.
अकरावीची परीक्षा दिलेली पूजा शनिवारी घरातून नाहीशी झाली. बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र रविवारी तिचा मृतदेह वाडा गावातील एका विहिरीत आढळून आला.
पूजाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर नऊ जणांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पूजा सकटने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी 306 अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद : प्रकाश आंबेडकर
कोरेगाव-भीमा प्रकरणाची साक्षीदार आणि तक्रारदार पूजा सकटचा मृत्यू संशयास्पद आहे. कोरेगाव-भीमा प्रकरणात पूजा एकमेव तक्रारदार होती. पोलिसांनी आधीच तिच्या एफआयआरवर तपास केलेला नाही. आता तिच्या मृत्यूप्रकरणी तरी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या साक्षीदार तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 04:20 PM (IST)
दोन दिवसआधी पूजाच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -