पिंपरी चिंचवड : आई वडील जिवंत असताना पिंपरी चिंचवडमधल्या दोन चिमुरड्यांवर पोलिस स्टेशनमध्ये राहण्याची वेळ आली आहे, तर आई-वडिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणामुळे मुलांचं बालपण मात्र हरपलं आहे.

आम्हाला आई-बाबा सांभाळायला तयार नाहीत, असं दोन चिमुरडे म्हणतात. प्रतिभा आणि रमेश भोसलेंमध्ये झालेल्या भांडणामुळे त्यांनी आपल्या पोरांना निगडी पोलिस स्टेशनमध्ये ठेवलं आहे.

आधी पण पोरांना कुठेतरी ठेवलं होतं. आम्ही त्यांना समजवत आहोत, पण ते ऐकतच नाहीत, असं पोलिस सांगतात.

सासरच्या जाचाला कंटाळून प्रतिभा माहेरी आली. मात्र आपल्या पोटच्या मुलांना दोन घास भरवण्यासाठीही आपल्याकडे पैसे नसल्यानं प्रतिभानं दोन्ही मुलांना पोलिसांकडे सोपवलं. मला नवऱ्यानं पैसे दिले, तर मी सांभाळू शकेन, असं प्रतिभा म्हणते.

जन्मदात्यांनीच मुलांना वाऱ्यावर सोडल्यानं आता मुलांची जबाबदारी पोलिसांकडे आली आहे. पोलिसांनी आई-वडिलांची समजूतही काढली, मात्र दोघंही आपल्या निर्णयावरुन मागे हटायला तयार नाहीत.

तुम्ही मुलांना अनाथाश्रमामध्ये ठेवा, असं आई-वडील म्हणतात. असं कोणीही करेल म्हणून आम्ही त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली, असं पोलिस सांगतात.

ज्या वयात आईच्या कुशीत आणि वडिलांच्या खांद्यावर खेळायचं... त्याच वयात या पोरांना पोलिस ठाण्याचा आसरा घ्यावा लागत आहे. कुणाच्याही वाट्याला असं बालपण येऊ नये!