पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे (Pimpari Chinchwad) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना नुकतंच "राष्ट्रपती पोलीस पदका"ने सन्मानित करण्यात आलंय. पण त्यांच्याच कार्यक्षेत्रातील जनतेचा जीव मात्र सध्या राम भरोसे आहे, असं म्हणण्याला रविवारच्या रात्री घडलेली भीषण घटना कारणीभूत ठरलेली आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास एकामागोमाग एक असे नऊ स्फोट झाले. गॅस चोरीचा काळाबाजार सुरु असतानाच ही घटना घडली. त्यामुळं या घटनेला पोलिसांची हफ्तेखोरीचं जबाबदार असल्याचा गंभीर आरोप कोणी ऐऱ्या-गैऱ्याने नव्हे तर थेट राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी केलाय.  ते ही थेट अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदेंच्या समोरच सावंतांनी हे बोलून दाखवलं. 


यापूर्वी याच ठिकाणी गॅस चोरीच्या काळाबाजारावर कारवाई झाल्यानंतर ही पुन्हा तोच गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. त्यामुळंच आरोग्य मंत्र्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं अन आजचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर हफ्तेखोरीचा आँखो देखा हाल मांडणार असल्याचं स्पष्ट केलं. यानिमित्तानं पिंपरी चिंचवड पोलिसांना हफ्तेखोरी महत्वाची की सामान्यांचा जीव महत्वाचा असा प्रश्न शहरभर चर्चेत आहे.


नेमकं काय घडलं?


ताथवडे येथील जेएसपीएम संस्थेला लागून असलेल्या जागेत रविवारच्या रात्री पावणे अकरा वाजता एक ब्लास्ट झाला. त्यानंतर एकामागोमाग एक असे तब्बल नऊ स्फोट झाले. या स्फोटांनी शहर अक्षरशः हादरून गेलं. तर स्थानिकांनी भीतीपोटी घरातून बाहेर पडत, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. तासाभरात जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचं रौद्ररूप हे काही किलोमीटर अंतरावरून ही जाणवत होतं. त्यामुळं साहजिकच या आगीच्या झळा लगत असणाऱ्या जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेतील तीन बस ना ही बसल्या होत्या. पण खरं वास्तव त्यानंतर पुढं आलं. 


हा स्फोट टँकरमधून गॅसची चोरीचा गोरखधंदा सुरू असताना झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. तब्बल सत्तावीस सिलेंडर घटनास्थळी आढळले. त्यातील नऊ स्फोट झाल्यानं छिन्न-विछिन्न झालेले, दहा भरलेले तर आठ भरल्यानंतर लिकेज झालेल्या अवस्थेत होते. सोबतच एकावेळी पाच टाक्यांमध्ये गॅस चोरी करता येईल असे नोजल, वजनकाटा आणि काळाबाजारासाठी अपेक्षित साहित्य ही हाती लागलं. मध्यरात्री ही कारवाई पार पडली अन सोमवारी सकाळीच आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी थेट घटनास्थळी धाव घेतली.  


तानाजी सावांतांचे खडेबोल


आरोग्य मंत्री घटनास्थळी येणार असल्यानं पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तितक्यात जेएसपीएम संस्थेच्या परिसरातून आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा ताफा घटनास्थळी पोहचला. सावंत गाडीतून खाली उतरले अन त्यांनी थेट पोलिसांना फैलावर घेतले. 'सुदैवाने ही घटना रात्री घडली, दिवसा घडली असती तर माझ्या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असता. इथं होणारा गॅस चोरीचा गोरखधंदा हा दोन नंबरने सुरु होता आणि त्याला पोलीसच जबाबदार आहेत, स्फोटक रसायनांची वाहतूक करणारी वाहन नागरी वस्तीत पार्क करण्याची परवानगी कोणी अन का दिली? इथं काय-काय चालतं याची सगळी माहिती माझ्याकडे आहे.' असा गंभीर आरोप सावंतांनी केला. 


'या पूर्वी गॅस चोरीच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल होता, असं पोलिसच सांगतात मग त्यानंतर पुन्हा हाच गोरखधंदा इथं कसा काय सुरु होता. याची कोण पाठराखण करतं? यासाठी हफ्ते सुरु होते, त्यामुळंच हा राजरोसपणे गोरखधंदा सुरु होता.' असा गंभीर आरोप सावंतांनी केला. 'आजचं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समोर हफ्तेखोरीचा आँखो देखा हाल मांडणार असून त्यांच्याकडून तुम्हाला फोन येईलच',  असा इशारा ही सावंतांनी दिला. यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदेंनी तातडीनं कारवाई करू असं मोघम उत्तर दिलं. 


आता जर मंत्री सावंतांकडे या गोरखधंद्याची माहिती होती म्हटल्यावर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे अन त्यांच्या आयुक्तालयातील पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नसेल असं म्हटलं तर सामान्य जनता त्यांची चेष्टा केल्याशिवाय राहणार नाहीत. आता जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेलगतच ही घटना घडल्याने आरोग्य मंत्री तानाजी सावंत संतापले, असं काहींकडून म्हटलं जाऊ लागलं. असं असलं तरी घटनेचं गांभीर्य पाहता त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांवर केलेले गंभीर आरोप ही नाकारून चालणार नाहीत.  एवढी गंभीर घटना घडल्यावर एखादा मंत्री आपला पाणउतार करणारच  याचं भान पोलीस आयुक्तांनी ठेवायला हवंच. त्यामुळं भविष्यात ही वेळ येऊन द्यायची नसेल तर 'राष्ट्रपती पोलीस पदक" सन्मानित पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गॅस चोरींसह अन्य गोरखधंदयांचा सोक्षमोक्ष लावतील अन शहरवासीयांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ थांबवतील, इतकीच काय ती त्यांच्याकडून माफक अपेक्षा. 


हेही वाचा : 


गॅस चोरीचा गोरखधंदा पिंपरी चिंचवडकरांच्या जीवावर, संतापलेल्या तानाजी सावंतांनी पोलिसांनाच धरलं धारेवर