Drug Mafia Lalit Patil : ड्रग्स मफिया ललित पाटील (Lalit Patil) ला पळून जाण्यात पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्स रॅकेट (Sasoon Hospital Drug Racket) प्रकरणातील ही नवी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News) ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानं प्रचंड खळबळ आहे.
ललित पाटील कसा पळाला?
ललित पाटील ससुन रुग्णालयातून निसटल्यानंतर आधी एका पंचतारांकित हॉटेलमधे गेला. तिथून रिक्षाने तो सोमवार पेठेत गेला. तिथे दत्ता डोके हा विनय अरहानाचा ड्रायव्हर ललित पाटीलसाठी कार घेऊन हजर होता. त्या कारमधून ललित पाटील पुण्यातील रावेतमधे पोहचला. तिथे पोहचल्यावर दत्ता डोकेने ललित पाटीलला विनय अरहाना याच्या सांगण्यावरून दहा हजार रुपये देखील दिले. ते पैसे घेऊन ललित पाटील आधी मुंबईला आणि तिथून नाशिकला गेला आणि तिथून गायब झाला.
विनय आणि ललितची ओळख कशी झाली?
ललित पाटील आणि विनय अरहाना या दोघांची ओळख ससुनच्या जिथे कैद्यांवर उपचार केले जातात त्या 16 नंबर वॉर्डमध्ये झाली. त्या ओळखीतून विनय अरहानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली. विनय अरहाना हा रोझरी स्कुलचा संचालक असून रोझरी स्कुलच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी एका बँकेकडून घेतलेले 46 कोटींचं कर्ज त्याने फॅशन शो आणि सेलिब्रेटींवर खर्च केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली अरहानाला अटक करण्यात आली, मात्र आजारपणाचे कारण देत तो ससुनमधे भरती झाला.
पुणे जिल्ह्यातील चाकण भागात अंमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटील बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ललित मागील चार महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता. वेगवेगळ्या आजाराची कारणं देत हा उपचार घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात वेगवेगळ्या कारणाने या ललितला आश्रय देत होतं का, असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.