पुणे : नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात एनडीएच्या 134 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा आज पुण्याच्या खडकवासलामधील खेत्रपाल ग्राऊंडवर पार पडला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
134व्या कोर्समध्ये बटालियन कॅडेट कॅप्टन अक्षत राज हा सुवर्ण पदकाचा (प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल) मानकरी ठरला. तर अकॅडमी कॅडेट कॅप्टन मोहम्मद सोहेल अस्लमला रौप्य पदकाने (प्रेसिडेन्ट्स सिल्व्हर मेडल) गौरवण्यात आलं. स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन अली अहमद चौधरीला कांस्य पदक (प्रेसिडेंटस ब्राँझ मेडल) मिळालं. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
अक्षत राज हा मूळचा बिहारचा आहे. मोहम्मद सोहेल अस्लम पश्चिम बंगाल तर अली अहमद चौधरी आसामचा आहे.
पास आउट होणाऱ्या एनडीए कॅडेटची शिस्तबद्ध परेड पार पडली. परेड झाल्यानंतर राष्ट्रपतींनी कॅडेट्सना संबोधित केलं. संरक्षण सेवेमुळे देशाचं ऐक्य कायम आहे असं राष्ट्रपती म्हणाले. तसंच एनडीएचं ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीदवाक्य कायम स्मरणात ठेवण्याचं आवाहनही त्यांनी कॅडेट्सना केलं.