Chandrakant Patil : आपला कुठलाही देव बॅचलर नाही आणि  महापुरुषदेखील बॅचलर नाहीत, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.  पुण्यात राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपला कुठलाही देव बॅचलर नाहीत. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाहीत. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कोणताही माणूस नाही ज्याचं रक्त हिरवं किंवा निळं नाही. देवाने किंवा परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. त्यांनी सर्वांना समान पाठवलं आहे. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं ते म्हणाले. प्रत्येक माणसाचा जन्म हा शुक्राणूपासून होतो. मात्र तो शुक्राणू आपल्याला दिसत नाही तरीदेखील 100 किलोचा माणूस तयार करतो. त्या शुक्राणूमधून माणूस तयार करणारा कोणीतरी आहे ना? प्रत्येक माणूस हा देवाने वेगळा बनवला आहे, असंही ते म्हणाले.


चंद्रकांत पाटील म्हणाले,  जगात 3 संस्कृती आहेत. एक सांगते बापाला मारा. दुसरी सांगते तू तुझा विचार कर दुसऱ्याच सोड आणि तिसरी आमची  हिंदू संस्कृती. ही संस्कृती आधी दुसऱ्यांना मोठं कर म्हणून सांगते. इंग्रज आले आणि आमची संस्कृती बदलली. त्यानंतर आईला मम्मी म्हणायला लागलो बाबाना पप्पा म्हणावं लागलं आणि आपण अपल्ली संस्कृती विसरलो. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते किंवा त्यांनी काही केलं नसतं तर इंथ बसलेले लोकं हे वेगळ्या वेषात दिसले असते, असंही त्यांनी म्हटलं आहे.


आता मुलंच मुलींना घाबरतात...


सध्या अनेक गोष्टी बदलल्या आहेत. सुरुवातील मुलांना मुली घाबरत होते. आता चित्र बदललं आहे. आता मुली मुलांची टिंगल करतात.  एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर जायला मुलं आता घाबरतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली होती. मात्र देव बॅचलर नाहीत, या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


आपला धर्म बुडाला का?


हिंदू हा एक विचार आहे. तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाण्यापासून हिंदू धर्म अडवत नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. आपल्या देशावर कितीतरी आक्रमणं झाली, मुस्लिम, इंग्रज, डच आले काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 


संबंधित बातमी-


'...म्हणून राजकारणात लोकसभा म्हटलं की नको रे बाबा, विधानसभाच बरी', चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?