Pune MPSC Protest : एमपीएसीची तयारी(MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक (Pune) भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आयोग नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार असल्याची मागणी पूर्ण करुन नोटीफिकेशन काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री यांनी आयोगाला नोटीफिकेशन काढण्याचे आदेश द्यावे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


विद्यार्थी म्हणाले की  नवा अभ्यासक्रम 2025 पासून सुरु करावा यासाठी शिफारस आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तीन महिन्यांवर परीक्षा आली आहे. त्यामुळे अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमसीक्यूचा अभ्यास करायचा कि थेअरी पेपरचा अभ्यास करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. 


या आधी आयोगाने रात्री दोन-तीन वाजता परीक्षेच्या बदलाबाबत नोटीफिकेशन टाकले आहे. त्यामुळे आमच्या मागणीसंदर्भातील कोणत्याही निर्णयाचं जोपर्यंत उत्तर येत नाही  तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवणार आहोत, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री आयोगाला यासंदर्भातील निर्णय द्यायला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरुन हालणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, आयोगाने बदललेल्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा विरोध नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी चार ते पाच वर्षापासून वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी परीक्षा पद्धतीनुसार करत आहेत. नव्या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. या नव्या बदलाला आत्मसात करून त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नाही. बदललेल्या परीक्षा पद्धतीमुळे तीन-चार वर्षापासून बहुपर्यायी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे.


सकाळपासून शेकडो विद्यार्थ्यी रस्त्यावर


एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाला घेऊन हे आंदोलन सुरु आहे. सकाळपासून शेकडो विद्यार्थ्यांनी पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडला आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरात या विद्यार्थी आंदोलन करत आहेत.


देवेंद्र फडणवीसांनी विद्यार्थ्यांची भेट घ्यावी


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील अनेक कार्यक्रमात हे हजेरी लावत आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलनातदेखील हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करावा आणि त्यांच्याशी चर्चा करावी, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


कधीतरी यूपीएससी लेव्हलचा अभ्यासक्रम लागू करावाच लागेल. हा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र ही मागणी मान्य केली तर 2025 मधील विद्यार्थी 2027 मध्ये लागू करा अशी मागणी करतील. त्यामुळे या संदर्भात योग्य निर्णय घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. 


संबंधित बातमी-


Pune MPSC Protest : पुण्यात MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर! 'या' आहेत प्रमुख मागण्या?