Omicron in Maharashtra : पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका अधिक सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर नियमांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर, पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी परदेशातून येणाऱ्याच्या प्रत्येकाचे नमुने घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. रविवारी पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळलेल्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या नऊ झाली. या पार्श्वभूमीवर महापौर उषा ढोरे आणि पालिका आयुक्तांनी राजेश पाटील पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले की, कोरोना आटोक्यात आल्याने आपण सर्व निर्बंध हटवले होते. ओमायक्रोन रुग्ण आणि परदेशातून आलेल्या रुग्णांना नवीन भोसरी रुग्णालयात उपचार होतील. ओमायक्रोनची लागण होणाऱ्या लहान मुलांसाठी नवीन जिजामाता रुग्णालयात उपचार केले जातील. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना नव्याने परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार ओमायक्रोनच्या उपाययोजना सुरूच होत्या. त्याप्रमाणे परदेशातून आलेल्या नाकरिकांना ट्रेसिंग सुरूच होते. तेव्हा नायजेरियाहून आलेल्या तिघांना आपण नवीन जिजामाता रुग्णालयात आपण ठेवलं होते. त्यानंतर ते तिघे कोरोना पॉझिटिव्ह आले आणि नंतर संपर्कातील ही तीन पॉझिटिव्ह आले.
या सहा जणांचे ओमायक्रोन टेस्टिंग करण्यात आले, त्यात ही पॉझिटिव्ह आलेले आहेत. या शिवाय इतर 86 परदेशी व्यक्तींचे आपण नमुने घेतले. त्यातले सात कोरोना पॉझिटिव्ह (ओमायक्रोन नव्हे) आलेले आहेत. पंधरा जणांचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी सांगितले की, परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ट्रेस करणे कठीण होते. त्यामुळे त्यांना विमानतळावरच 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात यावे, त्यासाठी आयुक्तांनी पावले उचलावीत अथवा परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या विलगीकरणाची सोय इतरत्र करावी असे महापौरांनी म्हटले.
पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनाचे ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर असे आहे नियोजन
> नवीन भोसरी रुग्णालय - परदेशातून आलेल्या कोरोना रुग्ण आणि ओमायक्रोनच्या रुग्णांसाठी राखीव
> नवीन जिजामाता रुग्णालय - कोरोना बाधित लहान मुलांसाठी
> थेरगाव रुग्णालय आणि कुटे रुग्णालय आकुर्डी - इतर सर्व कोरोना बाधित रुग्णांसाठी
> ऑटो क्लस्टर कोव्हीड रुग्णालय आणि जम्बो हॉस्पिटल - रुग्णांची संख्या वाढल्यास हे राखीव
> वायसीएम रुग्णालय - नॉन कोव्हीड रुग्णांसाठी राखीव