Actor Sharad Ponkshe Post on Anand Dave : ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासोबत कोणीही व्यवहार करू नये असे जाहीर आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावरून केले आहे. शरद पोंक्षे यांची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. शरद पोंक्षे यांनी 'मी व नथुराम' ह्या पुस्तकाच्या ८ व्या आवृत्तीचं लोकार्पणाच्या वेळी आलेल्या अनुभवावरून ही पोस्ट शेअर करत लोकांना आवाहन केले आहे. 


अभिनेते शरद पोंक्षे यांनी  'मी व नथुराम' हे पुस्तक लिहिले आहे.  या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या पुस्तकाच्या आठव्या आवृत्तीचे लोकार्पण ब्राह्मण महासंघातर्फे करण्याचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ठरवले होते असे शरद पोंक्षे यांनी म्हटले. त्यासाठी पोंक्षे आणि प्रकाशक पार्थ बावस्कर पुण्यात दाखल झाले होते. शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,  हॉटेलवर कृष्णा रेसिडेंसीवर दोन खोल्या दवेंनी आरक्षित केल्या होत्या. कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो. ह्या घटनेला महिना होऊन गेला तरी आज तागायत दवेंनी कृष्णा हॉटेलचे पैसे भरलेले नाहीत. व ते फोनही उचलत नसल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. 


व्हायरल होणाऱ्या फेसबुक पोस्टखाली अभिनेते शरद पोंक्षे आणि पार्थ बावस्कर यांची नावे आहेत. शरद पोंक्षे यांनी दवे यांच्या व्यवहारावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की,  ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले पण हा माणूस मला नेहमीच डॅंबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये असे आवाहनही पोंक्षे यांनी नागरिकांना आणि ब्राह्मण संघातील सभासदांना केले आहे. या पोस्टसोबत शरद पोंक्षे यांनी आनंद दवे यांचा फोटोही जोडला आहे.



ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आनंद दवे हे याआधी देखील काही भूमिकांवरून वादात अडकले होते. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळीदेखील आनंद दवे त्यांच्यासोबत होते. अभिनेते शरद पोंक्षे यांची ही पोस्ट व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी आनंद दवे यांच्यावर टीका केली आहे. 


आनंद दवे यांचेही प्रत्युत्तर


ब्राह्मण महासंघ आणि रूम बुकिंगचा संबंध नसल्याचे आनंद दवे यांनी म्हटले. शरद पोंक्षे यांचे सलग दोन कार्यक्रम ब्राह्मण महासंघने मागील महिन्यात पुण्यात घेतले होते. या कार्यक्रमांचे हॉल, बॅनर आणि त्या निगडित इतर खर्च यांची जवाबदारी  ब्राह्मण महासंघने घेतली होती ती पूर्ण केली. या दोन्ही कार्यक्रमासाठी आम्ही एक रुपयाची सुद्धा देणगी, वर्गणी मागितली नसल्याचे दवे यांनी सांगितले.