पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलें यांनी सोमवारी (6 डिसेंबर) होणाऱ्या महापरिनिर्वाण दीनानिमित्त अनुयायांनी गर्दी करु नये असे आवाहन देण्यासाठी लोणावळा येथे पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा धोका कायम असल्याने त्यांनी याप्रकारचं आवाहन केलं. पण यावेळी उपस्थित आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्येच खडाजंगी पाहायला मिळाली. आठवलेंच्या कार्यक्रमातच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला होता. पद वाटपावरून हा वाद झाल्याचं समोर येत असून यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता.
पत्रकार परिषदेवेळी एका व्यक्तीने आठवलेंकडे पदवाटपावरुन तक्रार केल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्याने त्याला टोकले. 'तुम्हाला गटबाजीच करायची आहे का?' असा जाब त्याने संबधित व्यक्तीला विचारला आणि त्यावरून वादाला तोंड फुटले. ज्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला. यावेळी आठवलेंनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच कोणाचं ऐकत नसल्याने आठवले पुढील कार्यक्रमाला रवाना झाले.
अनुयायांना गर्दी न करण्याचे आवाहन
देशात कोरोनाचं संकट अजूनही असल्याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी गर्दी करु नये यासाठी आठवलेंनी खास पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ''उद्या असणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातील अनुयायांनी गर्दी करू नये, घरी राहूनच अभिवादन करावं.'' अनुयायांना ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या अनुषंगाने हे आवाहन आठवलेंनी केलं.
मुंबईत येणाऱ्या अनुयांसाठी रेल्वेकडून विशेष सुविधा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) विशेष सुविधांचे नियोजन केले आहे. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री छत्रपटी शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवासाठी आठ उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. यामध्ये मुख्य लाइनवर अप विशेष कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- विशेष कल्याण येथून रात्री एक वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री अडीच वाजता पोहोचेल. त्यानंतर कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल. याबरोबरच मेन लाइनवर डाऊन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री दीड वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री तीन वाजता पोहोचेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष ही गाडी सीएसटी वरून रात्री अडीच वाजता सुटेल आणि कल्याणला पहाटे चार वाजता पोहोचेल. हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 2.35 वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.
इतर महत्वाच्या बातम्या
- Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा
- ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य
- साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर कोरोनाची धडक, दोघे पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ