पुणे : राज्यात सध्या कोरोना (Corona) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकारने लागू केलेल्या कोरोना निर्बंधाबाबत सत्तेत असलेले राष्ट्रवादीचेच मंत्री अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळाले आहे. "मला निर्बंधाच्या बाबतीत जास्त काही माहिती नाही, काल रात्री हे निर्बंध जाहीर केले असं काहीतरी समजतंय. मी सकाळपासून माझ्या कामात होतो. आज रात्रीपासून निर्बंध लागणार आहेत असं कळतंय, असं वक्तव्य गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. 


मंत्री  जितेंद्र आव्हाड म्हणाले, "कोरोनाबाबतचे निर्बंध रात्री जाहीर केले, याची मला माहिती मिळाली. मात्र त्यावेळी मी बाहेर होतो. या सर्व निर्णय प्रक्रियेत गृहनिर्माणमंत्री आपलं काम करत आहे. कोरोना सत्ताधारी पक्षात किंवा विरोधी पक्षात जाणार नाही. विश्वासात घेतले म्हणजे ओमायक्रॉन कमी होणार आणि विश्वासात घेतलं तर ओमायक्रॉन कमी होणार नाही, असं नाही"


मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम 
OBC वर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. यावरही आज त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम  असल्याचे सांगितले. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "वक्तव्य बदलणारा माणूस मी नाही. मी जे बोलतो ते माझ्या हृदयापासून असते. पोटात एक आणि ओठात एक असं बोलणारा माणूस मी नाही. मी पहिल्यांदा जे बोललो त्यावर आजही ठाम आहे." 


सध्या खूप घाणेरडे राजकारण सुरू 
"सध्याच्या पातळीवर राजकारण खूप खालच्या पातळीवर गेले आहे. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यात जो मनाचा मोठेपणा पहिला तो आता राहिला नाही. मी एवढे मोर्चे पाहिले पण माझ्या घरावर मोर्चा काढला जातो. घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या खूप घाणेरडे राजकारण सुरू आहे, असेही मंत्री आव्हाड यांनी यावेळी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या