Nivdunga Vithoda Temple : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात आहे. टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले....'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर....करत पालखी पुण्यात प्रस्थान झाली. निवडुंगा विठोबा मंदिराला पुण्याचं पंढरपूर म्हटलं जातं. त्यासोबत वारी परंपरा सुरु झाल्यापासून पालखीचा पहिला मुक्काम हा निवडुंगा विठोबा मंदिरात होतो. याच मंदिरात पालखी विसावा का घेते?
आख्यायिका काय आहे?
पालखी परंपरा सुरु झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ भाविकांना पंढरपूरच्या वारीला जाणं शक्य होत नव्हतं. त्यावेळी नाना पेठेत राहत असणाऱ्या गोसावी नावाच्या विठ्ठलाच्या भक्ताला पांडुरंगाने साक्षात्कार दिला. गोसावी हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. ते दरवर्षी वारीला जायचे. मात्र ज्यावेळी देहू, आळंदी ते पंढरपूर असा प्रवास अनेकांना वयानुसार शक्य होत नव्हता. त्यावेळी गोसावी यांना विठ्ठल प्रसन्न झाले. त्यांनी गोसावी यांना स्वप्नात येत साक्षात्कार दिला आणि निवडुंगाच्या झाडाखाली विठ्ठलाची मुर्ती असल्याचं सांगितलं. त्याकाळात नाना पेठेतील परिसरात भरपूर प्रमाणात निवडुंगाचे झाडं होते. त्यानंतर गोसावी यांनी निवडुंगाचं झाड तोडलं आणि या झाडाखालून स्वयंभू विठ्ठालाची मुर्ती बाहेर काढली आणि मंदिर बांधलं होतं.
अन् पालख्यांचा मुक्काम वेगवेगळ्या मंदिरात झाला..
मंदिर बांधल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यावर पालखीला पहिला मुक्काम याच मंदिरात केला जातो. मागील शेकडो वर्षांपासून या मंदिराला पालखी सोहळ्या दरम्यान सजवण्यात येतं. पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या कालांतराने वाढत गेली. हजारांची संख्या लाखांच्या घरात गेली. त्यावेळी या मंदिरात वारकऱ्यांसोबतच पुणे आणि ग्रामीण परिसरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली. त्यामुळे दोन्ही पालख्या वेगळ्या करण्यात आल्या. आता संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग विठोबा मंदिरात विसावा घेते तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात विसावा घेते.
त्यानंतर 1968 साली या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी गाभारा, सभामंडप बांधण्यात आलं. सुरुवातीला शेजारुन या मंदिराचे दरवाजे होते त्यानंतर समोरच्या बाजूने या मंदिराचा दरवाजा बांधण्यात आला. त्यानंतर मंदिराला मोठा फलकदेखील लावण्यात आला. आता मंदिरात सगळ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नाना पेठेत कायम वरदळ असते. त्यामुळे अनेक पुणेकरांना येता-जाताच विठुरायाचं दर्शन घडत, असं मंदिर व्यवस्थापक आनंद पाध्ये यांनी सांगितलं आहे.