पुणे: राज्यात जीबीएसच्या (Guillain-Barre syndrome) रूग्णांची संख्या सध्या 210 इतकी आहे. अनेक रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, हि दिलासादायक बाब असली तरी जीबीएसमुळे झालेल्या मृत्यूची संख्या 9 वरती पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील आणखी एका रूग्णाचा 'जीबीएस'मुळे मृत्यू झाला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे (Guillain-Barre syndrome) काल (सोमवारी, ता-17) पुणे शहरात आणखी एका मृत्यूची नोंद झाल्याने जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 9 वर पोहचली आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालात 9 मृत्यूंपैकी 4 मृत्यू जीबीएस (Guillain-Barre syndrome) आणि 5 संशयास्पद मृत्यू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाघोली येथील 34 वर्षीय व्यक्तीला आधी उपाचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 3 फेब्रुवारी रोजी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णाला 3 ते 8 फेब्रुवारी या काळात रुग्णाच्या मानेच्या, श्वसनाच्या, चेहऱ्याच्या आणि गिळण्याच्या स्नायूंची शक्ती कमी झाली. त्याला 7 फेब्रुवारी रोजी श्वासोच्छ्वासाच्या आणि मानेच्या स्नायूंचा अर्धांगवायू झाला. रुग्णावर जीबीएसचे सर्व उपचार सुरू होते. पण दुर्दैवाने 15 रोजी सायंकाळी रुग्णाला मृत घोषित करण्यात आले.
वाघोली येथे राहणाऱ्या या व्यक्तीला 23 ते 25 जानेवारी दरम्यान जुलाब झाले होते. त्याला 2 तारखेपासून पायांना मुंग्या येण्यास सुरुवात झाली व हाता-पायांची ताकद जाऊ लागली. त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पुढील तीन दिवसांत त्याच्या दोन्ही हात, पाय, मान व श्वसनक्रियेच्या स्नायूंचीही ताकद गेल्याने हालचाल थांबली होती. त्याला काही खाताही येत नव्हते. या रुग्णाला 7 फेब्रुवारीपासून व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याला 'आयव्हीआयजी'चा डोस रुग्णालयात भरती केल्यावर 24 तासांच्या आत दिला गेला व इतर औषधेही सुरू होती. परंतु त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. ती आणखीनच बिघडली व
अत्यवस्थ होऊ लागली, अखेर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या
पंढरपुरात जीबीएसचा विभाग सुरू
पूणे मुंबई या शहरात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. पुण्याचे दूषित पाणी उजनीत येते आणि ते पाणी पंढरपूर मार्गे कर्नाटककडे जाते. दूषित पाण्यातून जीबीएस हा आजार उद्भवतो. यामुळे पाणी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न असून, आरोग्य विभागाची यंत्रणाही सतर्क असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. जी.बी.एस. आजाराच्या धर्तीवर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. पंढरपूर मध्ये रोज लाखोच्या संख्येने देशभरातील भाविक येत असताना जीबीएसचा त्रास या भाविकांना होऊ नये म्हणून स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्य:स्थितीमध्ये पंढरपूर येथे जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. जीबीएसच्या अनुषंगाने पूर्व काळजी घेऊन उपचार करण्याच्या सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या असून उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहे.