Sharad Pawar On Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही.  काँग्रेसनं याबाबत आधीच चर्चा करायला हवी होती. बाळासाहेब थोरात टोकाची भूमिका घेत नाहीत. चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत विचारलं असता... कुणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा अधिकार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. 


नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्जावरुन काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांनी ऐनवेळी फॉर्म भरला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता का? असा प्रश्न निर्माण झाला होता. 


डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई -


पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेसनं प्रसिद्धीपत्रक काढत तांबेवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. 
या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती तसेच कारवाईची मागणी ही केली होती, असे काँग्रेसकडून सांगण्यात आलेय.  


शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्र केसरी विजेत्याचा सत्कार -
महाराष्ट्र केसरी राक्षे याचा शरद पवार यांनी शिंदे शाही पगडी देऊन सत्कार केला. पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवराज राक्षे याचं  अभिनंदन आणि सत्कार केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, काही कामामुळे काल महाराष्ट्र केसरीच्या फायनलला जाता आलं नाही. 


अनेक खेळाडूंना मदत केली आणि करतोय,आज सांगतोय गाजावाजा करत नव्हतो. मी आणि आमची भावकी हे काम करत होतो. मी शेवटची कुस्ती बघत होतो. कर्तृत्व दाखवलं शिवराज आणि जिंकला..   महाराष्ट्र केसरी हा पहिला टप्पा आहे, यानंतर सगळं आहे, असे शरद पवार म्हणाले. आजचा दिवस काशबा जाधव यांनी ऑलम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं. पण त्यानंतर कोणीही कुस्तीमध्ये पदक मिळवले नाही.  शिवराजने पदक जिंकावी, त्याला हवी ती मदत करु, असे शरद पवार म्हणाले.