पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. आज दुपारी अर्ज पडताळणीत वैध ठरला आहे. अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्ष पदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे. विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी तीन नावे चर्चेत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.


कोणती नावे होती चर्चेत?


विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचं नाव चर्चेत होतंच मात्र त्यांच्या नावाशिवाय लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं चर्चेत होती. मात्र, अखेर अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अण्णा बनसोडे अजित दादा समर्थक आमदार आहेत. त्याचबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.


कोण आहेत अण्णा बनसोडे?


अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये पहिल्यांदा आमदारपदी विराजमान झाले होते. त्यानंतर 2019 आणि 2014 असे सलग दोनवेळा आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले, आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली. दादांच्या बालेकिल्ल्याचे पिंपरीचे शिलेदार म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे. 


आण्णा बनसोडे यांचा प्रवास


- जन्म - ४ मे १९६८
- शिक्षण - hsc, iti 
- पक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- मतदार संघ - २०६ पिंपरी (अनुसूचित जाती, राखीव) 
- राजकीय कारकिर्द - 1997 आणि 2002 सलग दोन वेळा नगरसेवक
- दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष पद ही भूषवलं 
- २००९ ला पहिल्यांदा आमदार म्हणून निवड
- २०१४ ला पराभव
- पुन्हा २०१९ आणि २०२४ सलग दोन वेळा आमदार म्हणून विजय. 
- आमदारकीची तिसरी टर्म
- अजित पवार यांच्या प्रत्येक बंडात पाठिंबा. निष्ठावान म्हणून ओळख.