Pune Crime: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत चर्चेचा विषय ठरलीय. कोयत्याने हल्ला करून पळून जाणाऱ्या कोयता गँगचा उच्छाद चांगलाच वाढला असून मोटरसायकल सोडून पळून जाणाऱ्या हल्लेखोरांच्या धडपकडीत पोलीसांनी पुण्याच्या रांजणगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगला बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधून पकडलंय. पुणे पोलीस आता या आरोपींना ताब्यात  घेणार असून 23 मार्च रोजी पुण्याच्या एका युवकावर या गँगने हल्ला चढवला होता. दरम्यान, ही कोयता गँग मस्साजोगला कशी पोहोचली.   मोटरसायकलवरून येणाऱ्या कोयता गँगने (Koyta Gang) पोलिसांना बघून पळायचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या धरपकडीत अखेर कोयता गँगच्या मुसक्या आवळल्याच. या टोळीतले आरोपी नक्की कुठले याची चौकशी केली जात असून सात जण ताब्यात घेण्यात आले आहेत. या सात जणांसह अन्य आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. (Beed)


पुण्याच्या कोयता गँगला मस्साजोगमध्ये अटक


 गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलीस या कोयता गँगच्या शोधात होते. ही टोळी केज परिसरात आल्याचे कळताच पुणे पोलिसांनी केज पोलिसांना संपर्क साधत याची कल्पना दिली. त्यानुसार, मस्साजोगच्या पेट्रोलपंपावर पोलिसांनी सापळा लावला. सायंकाळी तीन मोटरसायकलवरून 7 जण येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच मोटरसायकल तिथेच सोडून या गँगने तिथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत कोयता गँगच्या मुसक्या आवळल्या. सर्व आरोपींना केज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या आरोपींना पुणे पोलिसांच्या स्वाधिन केलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रांजणगाव MIDC पोलीस ठाणा हद्दीत या टोळीने एका तरुणावर जीवघेणा कोयता हल्ला केला होता.  ओंकार देशमुख, गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे यांच्यासह अन्य आरोपींचा यामध्ये समावेश असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.


गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची चांगलीच दहशत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर कोयता हल्ले करत लूटमार करणे, गाड्यांची तोडफोड, किरकोळ कारणांवरून मारहाण करणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने सराईत गुन्हेगारांचं माहेरघर अशी ओळख होत असल्याचं बोललं जात आहे. कोयता गँगची वाढती धुडगुस पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे. दरम्यान, सिनेस्टाईल सापळा रचत पोलिसांनी या कोयता गँगला पकडल्याने या टोळीची पाळंमुळं शोधून काढणं शक्य होणार आहे.  या कोयता गँगचे सर्व रेकॉर्ड तपासले जात असून पुढील तपास सुरु आहे.


हेही वाचा:


Ladki Bahin Yojana: पुण्यातील सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात; योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणीत माहिती समोर