पुणे : आंदोलन करण्याची मुद्दाम परिस्थिती निर्माण केली जातेय का, असा मला प्रश्न पडतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकार संजय आवटे यांच्या ‘वुई द चेंज’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीवर काय म्हणाले शरद पवार?
”गोखले अर्थशास्त्र संस्थेकडे काम सोपवण्यात आले की, कोणत्या समाजाचे लोक आत्महत्या करत आहेत. त्या संस्थेचा अहवाल आला की, 52 टक्के शेतकरी मराठा समाजातील आहेत. विस्थापित मजुरांचं प्रमाणही मोठं आहे. ही अस्वस्थता मराठा मोर्चा आणि आरक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडते आहे.”, असे शरद पवार म्हणाले. मात्र, घटनेमध्ये जी ज्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे, त्यांच्या अधिकारांना, हक्कांना धक्का देखील लागता कामा नये, असेही पवारांनी नमूद केले.
यावेळी, “मुद्दाम आंदोलन करण्याची परिस्थिती निर्माण केली जातेय का, असा मला प्रश्न पडतो. आज गावा-गावात वातावरण बिघडतंय. लोकांचा सरकारवर विश्वास राहिलाय, असं मला वाटतं नाही.”, असेही शरद पवार म्हणाले.
मोदींवर निशाणा
“मोदी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा भाजपमधील दिल्लीतील खासदार निर्धास्त असतात. मी त्यांना सांगतो, 1977 ला पण अशीच परिस्थिती होती.”, असे पवार म्हणाले. तसेच, “राजकीय नेतृत्वापेक्षा आपल्या अधिकारांबाबत सजग असलेला नागरिक अधिक महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक या देशातील लोक सहन करत नाहीत.” असेही पवार म्हणाले.
बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर भाष्य
“यूपीएच्या काळात 40 हजार बांगलादेशींना परत पाठवले. पण ते बांगला देश सरकारशी बोलून. या सरकारने फक्त 1200 लोकांना परत पाठवलं आहे. मात्र 40 लाख लोकांना परत पाठवण्याचं बोललं जातंय. मात्र बांगलादेश सरकारनं ते 40 लाख लोक आमचे नाहीत, असं म्हटलंय. मग या बांगलादेशी नागरिकांच काय करायचं ?”, असे म्हणत पवारांनी बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
आंदोलन करण्याची परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जातेय? : शरद पवार
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Aug 2018 09:10 PM (IST)
“मोदी जेव्हा परदेशात जातात, तेव्हा भाजपमधील दिल्लीतील खासदार निर्धास्त असतात. मी त्यांना सांगतो, 1977 ला पण अशीच परिस्थिती होती.”
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -