Sharad Pawar Press Conferance: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasaba Bypoll) भाजपच्या हेमंत रासनेंचा (Hemant Rasne) पराभव करुन निवडून आलेल्या रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची (NCP Chief Sharad Pawar) भेट घेतली. धंगेकरांनी कसब्यात रासनेंचा पराभव करुन ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल 28 वर्षांनी भाजपच्या ताब्यातून कसब्याचा गड काँग्रेसच्या (Congress) धंगेकरांनी हिसकावला. पण कसब्यात धंगेकर विजयी होतील याची खात्री शरद पवारांना नव्हती. स्वतः शरद पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना भाष्य केलं आहे. त्यासोबतच कसब्यात मविआची एकजूट दिसली. भाजपचा कसबा गड ढासळला. भाजपनं कसब्यात बापट, टिळकांना डावलून निर्णय घेतले, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. त्यासोबतच जनतेला बदल हवा आहे, बदलासाठी सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे.
कसब्यात मविआला यश मिळेल बोलत होते, पण मला खात्री नव्हती : शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलताना म्हणाले की "कसब्यात यश मिळेल असं सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती. हे मुख्य कारण आहे. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केलं होतं. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचं लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असं वाटत होतं. पण या उमेदवाराचं काम परिणामकारक ठरलं. हा उमेदवार कधीच चारचाकीत बसत नाही. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे दोन पायांवर चालणाऱ्यांनी यांना मते दिली."
महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय : शरद पवार
"महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय. त्यासाठी लोंकानी एकत्र यायला हवे. देवेंद्र फडणवीसांनी धंगेकरांचा विजय हा वैयक्तिक होता, असं म्हटलं. हरकत नाही. या उमेदवाराला तिकिट देण्यात आमचं व्हिजन होतं, हे तर त्यांनी मान्य केलं. रवींद्र धंगेकर यांनी मागील तीस वर्षे जे काम केलं त्याला लोकांनी मतं दिली." असं शरद पवार म्हणाले. "संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला किती जागा निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. ते पत्रकार आहेत. पत्रकारांना अधिक अभ्यास असतो.", असंही ते म्हणाले आहेत.
पंतप्रधानांना नऊ विरोधी पक्षांनी जे पत्र लिहलंय त्यावर सर्वात पहिली सही माझी : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील प्रमुख विरोध पक्षांच्या 9 नेत्यांनी पत्र लिहिलंय. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधानांना नऊ विरोधी पक्षांनी जे पत्र लिहलंय त्यावर सर्वात पहिली सही माझी आहे. केजरीवाल यांच्या सरकारनं शाळांसाठी जे काम केलंय ते पाहण्यासाठी बाहेरुन लोक येतायत. राहुल गांधींनी परदेशात जाऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यात चुकीचं काय आहे. विरोधकांची एकजूट कॉंग्रेसला सोबत घेऊनच झाली पाहिजे. कॉंग्रेस हा या देशातील महत्वाचा पक्ष. प्रत्येक गावात कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे."
शहाण्या माणसाबद्दल विचारा : शरद पवार
चंद्रकांत पाटील यांच्याबाबतही शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवारांनी शहाण्या माणसाबद्दल विचारा असं म्हणत टोला हाणला आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या खेडच्या सभेला राष्ट्रवादीचे लोकही होते, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना "उद्धव ठाकरेंच्या सभेत जर राष्ट्रवादीचे लोक असतील तर आनंदच आहे. कारण आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच भूमिका माडंतायत आणि या तीन पक्षांची ताकद कालच्या सभेत दिसली.", असं शरद पवार म्हणाले.