मुंढे यांची तडकाफडकी बदली करुन त्यांच्या जागी रामास्वामी एन. हे नवी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. मात्र मुदतीच्या आधीच मुंढेंची बदली झाल्यानं नवी मुंबईतल्या नागरिकांमध्ये नाराजी आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात अविश्वास ठरावही मंजूर केला होता. तसेच नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांच्या बदलीची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी मुंढेंची बदली टाळली होती. अखेर आज त्यांची बदली करण्यात आली आहे.
25 ऑक्टोबर 2016 रोजी तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर 105 विरुद्ध 6 असा अविश्वास ठराव मंजूर केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं होतं. तर भाजपने ठरावाच्या विरोधात म्हणजेच मुंढेंच्या बाजूने मतदान केलं होतं.
महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, असं आरोप तेव्हा त्यांच्यावर करण्यात आले होते.
आयुक्त तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द
तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 4 मे 2016 रोजी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई करण्याचा सपाटा त्यांनी लावला होता. त्यामुळे त्यांच्याविरोधात पालिकेत एकमताने अविश्वास ठराव मंजूर झाला.
यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं. 2012 मध्ये जालन्यातही ते जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते. गतिमान प्रशासन आणि पारदर्शी कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.
तुकाराम मुढें यांच्यासोबत इतरही दोन आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची भंडाऱ्याच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.