पुणे : निष्काळजीपणे बाईक चालवल्यामुळे त्यावरुन पडून आईचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या खडकी भागात राहणाऱ्या 36 वर्षीय विशाल विलास बेडमुठ्ठावर आईच्या अपघाती निधनाची कुऱ्हाड कोसळली असतानाच त्यासाठी त्यालाच जबाबदार ठरवत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


रविवार 19 मार्चला सकाळी साडेअकराच्या सुमारास मायलेक बाईकवरुन चालले होते. विशाल 60 वर्षीय आई शामल बेडमुठ्ठा यांच्यासह एसबी रोडवरील ओम सुपरमार्केटमध्ये फळं आणण्यासाठी गेला होता. विशालने 'पुणे मिरर'ला दिलेल्या माहितीनुसार सिम्बॉयसिस कॉलेजबाहेर स्पीडब्रेकरजवळ हा अपघात घडला. एक भटका कुत्रा अचानक बाईकसमोर आल्याने वेग कमी केला. आम्ही स्पीडब्रेकर
क्रॉस केला, मात्र आईच्या मांडीवर असलेली आंब्याची पेटी घसरल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली, असं विशालने सांगितलं.

पोलिसांनी मात्र विशालचा दावा फेटाळून लावला आहे. एफआयआरनुसार विशाल प्रचंड वेगाने बाईक चालवत होता, त्यामुळे त्याची आई बाईकवरुन पडली आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

अपघातानंतर शामल यांना कोणतीही दुखापत दिसत नव्हती, त्यामुळे त्या घरी मुलाला नेण्यास सांगत होत्या. विशालने मात्र त्यांना जवळच्या जोशी रुग्णालयात नेलं असता अंतर्गत रक्तस्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना पुना रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं.

'माझा मुलगा आईला नेहमी बाईकवरुन बाहेर नेतो. तो वेगाने बाईक चालवत असल्याची शक्यताच नाही. माझ्या बायकोला घरी बसून करमत नाही. त्यामुळे मोठ्या किंवा धाकट्या मुलासोबत ती नेहमी बाहेर जाते. मुलावर नोंदवलेला गुन्हा चुकीचा असून हा केवळ दुर्दैवी अपघात होता.' असं विशालच्या वडिलांनी सांगितलं.

विशालवर कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304 (अ) (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेडमुठ्ठा कुटुंब कठीण प्रसंगाला तोंड देत असल्यामुळे आम्ही आरोपीला अटक केली नाही, त्यांना धार्मिक कार्य करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.