पुणे: डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या 'रेअरेस्ट ऑफ द रेअर' या कॅटेगरीत बसत नसल्याने आपण आरोपींच्या फाशी मिळावी ही मागणीच केलेली नव्हती, असा खुलासा सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रकाश सुर्यवंशी यांनी केला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्याप्रकरणाचा (Narendra Dabholkar case) निकाल देताना सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आपण या दोघांना फाशी व्हावी, अशी मागणीच केली नव्हती, असे सीबीआयच्या (CBI) वकिलांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना तिघांची निर्दोष मुक्तता केली. यापैकी आरोपी क्रमांक एक असलेला वीरेंद्र तावडे याच्या विरोधातील साक्षीदार फितूर झाल्याने तावडे निर्दोष सुटल्याचे ॲडव्होकेट सुर्यवंशी यांनी म्हटले.  
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर मॉर्निंग वॉकला गेले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी आणि हत्येमागील मास्टरमाईंड पकडला जाईल, अशी आशा होती. परंतु, सुरुवातीला पुणे पोलीस, त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) दिशाहीन तपासामुळे डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा काहीच माग निघाला नव्हता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.


डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील तीन आरोपी निर्दोष कसे सुटले?


सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती पी.पी. जाधव यांनी या प्रकरणातील पाचपैकी तीन आरोपींना म्हणजे डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पु्न्हाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. डॉ. वीरेंद्र तावडे यांच्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. तर संजीव पुन्हाळेकर यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप होता. तर विक्रम भावे हा संजीव पुन्हाळेकर यांच्या कार्यालयात काम करायचा. या तिघांचा हत्येच्या कटाशी संबंध असल्याचा आरोप होता. मात्र, न्यायालयाने या तिघांचीही पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.


आणखी वाचा


डॉ. नरेंद्र दाभोलकर निकाल : 11 वर्षांचा प्रतीक्षा, 17 मिनिटात निकाल, कोर्टात काय काय घडलं?


डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरण : कोर्टाच्या निकालाचं स्वागत पण, निर्दोष सोडलेल्यांविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार; हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया