पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साडया वाटप करणे आणि विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या समर्थकास भाेवले आहे. निवडणुक भरारी पथकाकडून याप्रकरणी यासंर्दभात दत्तवाडी पाेलीस ठाण्यात निवडणुक आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेकडे भाजपच्या कार्यकर्त्या माधवी निगडे यांनी लेखी तक्रार केली आहे. सदर तक्रारीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची हिंदमाता प्रतिष्ठान संस्था आहे. हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरातील लाेकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे विविध विधानसभा मतदारसंघात संत महंत व शक्ती पीठाचे पादुकांचे दर्शनाचे व महाप्रसादचे कार्यक्रम आयाेजित केले होते .


आचार संहिता भंग केल्याचं सांगत त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच रवींद्र धंगेकरांच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या घडाळ्याच्या चिन्हाचा वापर करण्यात आला होता. त्यावरुन धंगेकरांवर टीका करण्यात आली. मात्र त्यांनंतर धंगेकरांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकार आमच्याकडून चुकून झाला होता. ती प्रिंटींगची चूक होती. ती चूक आम्ही सुधारली आहे, असं धंगेकर म्हणाले. 


आज मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे. राज ठाकरे सभेत नेमकं काय बोलणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सारसबागेसमोर ही सभा होणार आहे. सभेसाठी सारसबागेची जागा निवडण्यात आली त्यावरु टीका केली जात आहे. पुणेकरदेखील या जागेसाठी विरोध करत आहेत. त्यावर बोलताना धंगेकर म्हणाले की, त्यांनी कुठे सभा घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे . त्यासंदर्भात मी काहीही बोलणं गरजेचं नाही. आचारसंहिंता सुरु असल्याने मी या संदर्भात काहीही बोलणार नाही.