पुणे : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) चर्चा आहे. या योजनेसाठी महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, महिलांना हा अर्ज भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच सरकारने या योजनेत आतापर्यंत अनेकवेळा महत्त्वाचे बदल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भर सभेत या योजनेबाबत असाच एक गोंधळ दूर केला आहे. त्यांनी कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल, याबाबत सांगितलं आहे. 


अजित पवार सभेत नेमकं काय म्हणाले? 


अजित पवार आज (14 जुलै) बारामतीच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका सभेला संबोधित केले. भाषणात त्यांनी राज्य सरकारच्या अनेक योजनांचा उल्लेख करत महिला, शेतकऱ्यांसाठी सरकार खूप काही करत असल्याचा दावा केला. याच आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख केला. "आम्ही लाकडी बहीण योजना आणली. या योजनेवरून काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली. परंतु मी त्याला फार महत्त्व दिले नाही. महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मी असेल, ही योजना आपण प्रभावीपणे राबवू शकतो, असा मला विश्वास होता. या योजनेच्या माध्यमातून मला गरीब महिलेला, माताले, माझ्या मुलीला मला मदत करायची होती. या योजनेसाठी आपण 1 जुलैला काम सुरू केलेलं आहे. मला उभ्या महाराष्ट्रातील महिलांना सांगायचं आहे की, महिलांनी अर्ज करावा तो वेळेत मंजूर करण्याची काळजी आम्ही घेऊ," असे अजित पवार यांनी सांगितले. 


ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये


"महिलांनी मला सांगितलं की या योजनेसाठीच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. मग सरकारने पिवळे, केशरी रेशनकार्ड मंजूर केले. महिलांना त्रास कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेतला. या योजनेतून साधारण अडीच कोटी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतील," अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच ऑक्टोबर महिन्यात रक्षाबंधन आहे. या महिन्यात माझ्या भगिनीच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये येणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली.   


अजित पवार यांनी गोंधळ दूर केला


मला एक महिला विचारत होती की चारचाकी वाहन असल्यावर या योजनेचा लाभ मिळणार नाही का? मी म्हणालो की ट्रॅक्टर असलं तरी लाभ मिळेल. परत ती महिला मला म्हणाली की माझे पती ड्रायव्हर आहेत. ते रात्री गाडी घेऊन घरी येतात. मग ती गाडी आमचीच समजतील. त्यात माझी काय चूक आहे. पण मी तमाम ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नींना सांगतो की स्वत:च्या नावावार चारचाकी असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार नाही. जे ड्रायव्हर आहेत, त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  


हेही वाचा :


Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवा जीआर, केला 'हा' मोठा बदल!


लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे? तिसरी अट वाचा मगच करा सही; अन्यथा...