बारामती : एमपीएससी एक मायाजाल आहे, असं स्वप्निल लोणकरने लिहलं आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला. खरंतर सरकारने लवकर परीक्षा नाही घेतली किंवा विद्यार्थ्यांना कोणतं ठोस आश्वासन नाही दिलं तर मुलं नैराश्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. स्वप्निलने जो निर्णय घेतला तशाच प्रकारचे पाऊल मुलं उचलू शकतात. मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील मुलं ही अधिकारी बनायचं स्वप्न बघून मोठ्या शहरात अभ्यासासाठी येत असतात. यातील बहुतांश मुलं ही शेतकऱ्यांची मुलं असतात. स्वप्न फक्त एकच अधिकारी बनायचं. मुळात ग्रामीण भागात राहत असल्याने त्यांना याची माहिती उशिरा कळायची. कारण ग्रामीण भागता कधी करिअर बद्दल विचारच केला जात नव्हता. त्यामुळे कॉलेज संपवून झाल्यानंतर काय करायचं तर अधिकारी व्हायचं असं बहुतांश मुलं ठरवतात.  शहरात आल्यावर सुरवातीचे काही महिने कळण्यातच जातात. त्यात न्यूनगंड मोठा असतो. अभ्यास कसा करायचा? कुठं करायचा? कोणता क्लास लावायचा? फी कशी भरायची? इतकी फी भरायला परवडेल का? असे यक्ष प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभे राहतात. मुलं घरी पैसे मागतात. पोटाला चिमटा घेऊन आई-बाप पोराला पैसे दर महिन्याला पाठवत असतात. 


सगळीच मुलं अधिकारी होतात का तर नाही. एक दोन परीक्षा दिल्यावर काही  मुलं दुसरा मार्ग चोखाळतात. तर काही तसेच प्रयत्न करत राहतात. सगळीच मुलं खरंच मनापासून अभ्यास करतात का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. काही जण येतात आणि निघून जातात. पण काही मुलं खरच अभ्यासासाठी येत असतात. रात्रंदिवस अभ्यास करतात. अशी आता असंख्य मुलं आहेत जी 26 ते 32 वयाच्या मधली आहेत. त्यांना कळत नाहीये पुढं काय करावं. एकप्रकारे एमपीएससी हेच आयुष्य मानून मुलं बळी जात आहेत. यातील असंख्य मुलाचं असंच म्हणणं आहे की येणारी परीक्षा ही शेवटची परीक्षा. पण  हीच परीक्षा कधी होणार कोणालाच माहिती नाही. ज्यावेळी एमपीएससीची मुलं भेटतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात की आमची परीक्षा कधी होणार आहे माहित आहे का? 


आज मुलांची वय एवढी झालीत की जी शहरात राहतात त्यांना घरी जायची लाज वाटते. की आपण एवढे मोठे झालो अजून कमवत नाही आहोत. घरी जावं तर घरी जाऊन काय सांगणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना असतो. अजून किती दिवस परीक्षा देणार? नोकरी लागते का नाही? असा प्रश्न गावकरी आणि नातेवाईक विचारत असतात. त्यामुळे किती तरी मुलं आणि मुली अशा आहेत की ज्या घरी गेलं तरी कुणाच्या कार्यक्रमात, सार्वजनिक समारंभात जात नाहीत.  घरचे ही लोकं एवढं अपेक्षा लावून बसले असतात की एक ना एक दिवस आपला मुलगा किंवा मुलगी अधिकरी होईल आणि आपले दैन्य हटेल. त्यांनी अपेक्षा करणं साहजिक आहे. पण यात घुसमट होते ती अभ्यास करणाऱ्या मुलामुलींची. एकीकडे आपलं वय झालेलं असतं. दुसरीकडे लोकांचे टोमणे असतात. ही टोमणे मारणारे लोकं फार लांबची असतात असं नाही ती घरातलीच असतात.  तिसरीकडे अभ्यासाचा ताण आणि चौथीकडे परीक्षा कधी होणार हा प्रश्न.


कोरोनाचे कारण देत सरकार चालढकल करतंय. त्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही परीक्षा होऊ देणार नाही असा पवित्रा मराठा नेते घेतात. पण विद्यार्थ्यांना काय वाटतं हे या नेत्यांनी जाणून घेतलं पाहिजे. अशा काळात सरकारने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे किती लक्ष दिला असा प्रश्न यानिमित्ताने पडल्याशिवाय राहत नाही.  


स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची परीक्षा दिली होती त्यासाठी 1161 पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली, त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. शेवटची पोलीस भरतीही 2019 साली झाली. सरकारने साडेबारा हजारांची पोलीस भरती करणार अशी घोषणा केली पण ती कधी होणार हे नाही सांगितले. PSI ची मुख्य परीक्षा 2019 साली झाली त्याचं आद्यप ग्राउंड (शारीरिक चाचणी) झालेली नाही. RTO ची पूर्व परीक्षा होऊन 16 महिने झाले तरी आद्यप त्याचा निकाल लागला नाही. राज्य सेवेची पूर्व परीक्षा दीड वर्षाने 21 मार्चला झाली तरी अद्याप त्याचा निकाल नाही. संयुक्त पूर्व परीक्षेचा (पीएसआय, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी) अर्ज भरून 2 वर्ष झाली तरी अजूनही परीक्षा झाली नाही.  अनेकांच्या नियुक्त्या झाल्यात पण ते ट्रेनिंगच्या प्रतीक्षेत आहेत.  विद्यार्थ्यांनी वाट तरी किती काळ बघायची हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.


एमपीएससीला विद्यार्थी आपलं आयुष्य मानून बसले आहेत. अनेक मुलं यात वाहवत चालली आहेत. आता अनेक जण अशा टप्प्यावर आहेत की त्यांना अशी आशा आहे की आपण या परीक्षेत पास होऊ शकतो. आणि तसं वाटण्यात काही चूक नाही. पण कुठं थांबायचं हे मात्र कळणे फार गरजेचं असतं. हे कळण्याचा अभाव असल्याचं जाणवतं. एमपीएससी सोडून अशा करिअरच्या अनेक वाटा आहेत हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. त्यामुळे जो स्वप्निलने निर्णय घेतला तो निर्णय इतरांनी घेऊ नये. मात्र विद्यार्थ्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये. 


एकीकडे राजकीय मेळावे होत आहेत.  निवडणुका होतात परंतु MPSC ची परीक्षा घ्यायला मात्र सरकारला वेळ नाही. लाखो मुलं ही MPSC ची तयारी करत आहेत. ती मुलं एकच प्रश्न विचारत आहेत परीक्षा कधी होणार? सरकारने आता तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी.