Pune dahihandi 2022: पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड हे भाग सायंकाळी दहीहंडीनिमित्त वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. दहीहंडी उत्सवानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवासाठी मध्यवर्ती भागात बाजारपेठ असल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे आज (19 ऑगस्ट) सायंकाळी 5 नंतर शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड तसेच बुधवारी चौक ते दत्त मंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवादान चौक, टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, नवी पेठेपर्यंत वाहनांना बंदी केली आहे. रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक मार्गे बर्वे चाका (मॉडर्न कॅफे) चा वापर करावा. पूरम चौक ते बाजीराव चौक ते शिवाजी नगर असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टिळक रोड, अलका टॉकीजमार्गाचा वापर करावा. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणारे वाहनचालक जंगली महाराज रोड, झाशी राणी चौक मार्गे इच्छित स्थळी जावे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौकापर्यंत वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंत वाहनांना बंदी आहे. वाहनधारकांनी बाजीराव रोडने इच्छित स्थळी जावे.
गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नजर
शहरासह उपनगरात 961 लहान-मोठी मंडळे दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस दल (SRPF), होमगार्डच्या तुकड्या तैनात केल्या जातील.
नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून आवाहन
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मंडळांनी नियमांचे पालन करून दहीहंडीचा सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी महोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी देखील पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. याच नियमानुसार यंदा गोविंदांना दहीहंडी साजरी करता येणार आहे. यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. दहीहंडी उत्सव होणार आहे. यामुळे पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.