Pune PMC News: वारजे येथे 700 बेडच्या सुसज्ज रुग्णालयाच्या (Warje hospital, Pune) प्रस्तावाला काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे. गरीब रुग्णांना कमी किमतीत आरोग्य सुविधा देण्याच्या नावाखाली पुणे महानगरपालिका (Pmc) कोट्यवधी रुपये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या घशात घालत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. आयुक्तांनी प्रशासक पदाचा गैरवापर केल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. वारजे येथील प्रस्तावित रुग्णालयाच्या बांधकामाला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने फेब्रुवारी 2022 मध्ये मान्यता दिली.
दहा हजार चौरस फूट जागा पुणे महानगरपालिका (PMC) उपलब्ध करून देणार आहे. खासगी संस्था हे रुग्णालय ‘डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, ट्रान्सफर’ या तत्त्वावर बांधणार असून त्यासाठी महापालिका नेदरलँड राबोबँककडून 1.5 टक्के व्याजदराने 350 कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. त्याचा खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे. नागरिकांना या रुग्णालयात कमी दरात आरोग्य सुविधा मिळणार असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र कोटय़वधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचा सर्वसामान्य पुणेकरांना कोणताही फायदा होणार नसल्याने या प्रस्तावाला विरोध होत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. पालिका स्वखर्चाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कोट्यवधी रुपयांचा भूखंड विकसित करणार आहे. हे चुकीचे असून कमी दरात आरोग्य सुविधा देण्याच्या नावाखाली पुणेकरांच्या विरोधात निर्णय घेतला जात नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापुर्वीदेखील पुण्याच्या पालिकेच्या कारभारावर कॉंग्रेसने अनेकदा बोट दाखवलं आहे. पालिकेचा कारभार हा जनतेची लूट करण्यासाठी आहे, असे अनेकदा त्यांनी आरोपदेखील केले आहे. खड्ड्यांच्या बाबतीत देखील कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेला धारेवर धरलं होतं. पाणी, रस्ते, खड्डे, वाहतुक कोंडी या सगळ्यांवर टीका केली होती. पुण्यातील कॉग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी बॅनर लावत टीका केली होती. शहरात सुरु असलेल्या कामांवरुन त्यांनी ही टीका केली होती 'काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ते घरपट्टीत वाढ, काय ती पाणी पट्टीत वाढ, काय ती स्मार्ट सीटी, काय तो कोट्यावधींचा घोटाळा' असं त्यांनी या बॅनरवर लिहिलं होतं. सध्या शहरातील घरांच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि स्मार्ट सीटीच्या नावाखाली अनेकदा मोठे घोटाळे देखील समोर आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून अशा प्रकारच्या योजनांना विरोध होत आहे.