Pune News: पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार धरणे पूर्ण क्षमतेने आहेत. विशेषत: पाणलोट क्षेत्रात सतत पडलेल्या पावसामुळे ही धरणं तुडूंब भरली आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणांचा एकत्रित पाणीसाठा 100 टक्के (29.15 टीएमसी) आहे.
मागील वर्षी याच दिवशी चार धरणांतील एकत्रित पाणीसाठा 96.16 टक्के होता. (28.02 टीएमसी). प्रशासनाने धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. खडकवासला धरणातून 4 हजार 708 क्युसेक, पानशेत धरणातून 1 हजार 954 क्युसेक, वरसगाव धरणातून 570 क्युसेक आणि टेमघर धरणातून 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत अंदाजे 11.08 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
यंदा कडाक्याच्या उन्हानंतर मान्सूनपूर्व पाऊस झाला नाही. यासह मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे लहान प्रकल्पाची धरणे ओसंडून वाहू लागली. जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 18 धरणे भरली आहेत. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
पुण्यात पावसाळ्याआधी पाणीकपातीची परीस्थीती निर्माण झाली होती. त्यासोबत पिंपरी-चिंचवड परिसरात देखील तिच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र काही दिवसातच पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला होता. यावर्षी पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणार पुर्ण क्षमतेनं पाणीसाठा झाल्याने पाण्याबाबत पुणेकरांना समस्या निर्माण होण्याच्या शक्यतेला पुर्णविराम लागला आहे.
चार धरणांमधील पाणीसाठा :
खडकवासला: 1.97 टीएमसी (100%)
पानशेत: 10.65 टीएमसी (100%)
वरसगाव: 12.82 टीएमसी (100%)
टेमघर: 3.71 टीएमसी (100%)
जिल्ह्यातील 18 धरणात पुर्ण क्षमतेनं पाणीसाठा
पुणे (Pune) जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी (Dam) 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील येडगाव, वडज, घोड, चिल्हेवाडी, कलमोडी, चासकमान, भामा आस्केड, वाडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे पुणे जिल्हातील पाण्याची समस्या संपण्याची शक्यता आहे.