Shital Mhatre :  शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आक्षेपार्ह पोस्ट कमेंट आणि मॉर्फ व्हिडीओ टाकणाऱ्या संबंधितांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी  शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी केली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. 


यावेळी शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांच्या बदनामीचा कट करणाऱ्या आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या फेसबुक अकाउंटवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यासंबंधीचे दोषी आढळलेल्यांवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून आयपीसी कलम 354 ,471, 509, 499, 500 अंतर्गत योग्य ती कारवाई करण्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन दिलं आहे. यावेळी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवती सेनेच्या शर्मिला येवले, पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, महिला आघाडीच्या ऍड.मोनिकाताई खलाने आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


विधीमंडळातदेखील चर्चा

या घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. विधिमंडळ अधिवेशनात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या व्हायरल व्हिडीओचा आरोप ठाकरे यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी असल्याचा आरोप करण्यात आला. 


व्हिडीओ प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार ;  शंभूराज देसाई यांनी घोषणा


दरम्यान शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एसआयटीकडून चौकशी होणार असल्याची शंभूराज देसाई यांनी घोषणा केली आहे. दहिसर पूल हद्दीत हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यकर्ते होते. यावेळी बाईक रॅली काढली होती. व्हिडीओतील संवाद चित्रीकरणामध्ये एडिटिंग करून फेसबुक माध्यमातून अपलोड करण्यात आला असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली आहे. 


चित्रा वाघ यांचा पाठिंबा...


शितल म्हात्रेंना चित्रा वाघ यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्वीट करत पाठिंबा दर्शवला आहे. ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात की, "शितल, तू लढ. आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शितलपुरता मर्यादीत नाहीचं, राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा.'