Pune Vinay Arhan :  पुण्यातील नामांकित रोझरी इंटरनॅशनल स्कूलचे (Vinay Arhana)  संचालक विनय अरहाना यांनी  शाळेच्या साहित्याच्या खरेदीसाठी आणि शाळेच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी घेतलेले 21 कोटी रुपयांचे कर्ज  बॉलीवूड सेलीब्रिटीजच्या पार्ट्यांवर खर्च केल्याच समोर आलं आहे. विनय अरहाना आणि त्याची रोझरी इंटरनॅशनल स्कूल ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.  विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची भरमसाठ फी साठी रोझरीकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप करत अनेकदा पालकांनी आंदोलनं केली आहेत.  दुसरीकडे विनय अरहाना याने विद्यार्थ्यांसाठी घेतलेले पैसे बनावट कागदपत्रांच्या आधारे पार्ट्या करण्यावर उडवल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे.


शाळेची स्थिती खराब


विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी घेतलेलं 21 कोटी रुपयांचं कर्ज पुण्यातील रोझरी स्कुलचा संचालक विनय अरहाना यानं सेलिब्रिटीजच्या पार्ट्यांवर उडवल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी , फॅशन शो आणि महागड्या गाड्या यांवर विनय आरहाना याने केलेली दौलतजादा थोडी थोडकी नाही तर 21 कोटी इतकी आहे. दुसरीकडे रोझरी इंटरनॅशनल  स्कुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांनी फीच्या स्वरूपात लाखों रुपये मोजूनही शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. फीच्या स्वरूपात दरवर्षी विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून लाखो रुपये जमा करणाऱ्या रोझरी इंटरनॅशनल  स्कुलच्या शाळांच्या इमारतींमधील एकही वर्ग असा नाही ज्या वर्गाच्या खिडक्या जागेवर आहेत. आतील अवस्था तर आणखी विदारक आहे. कारण या इमारतींच्या दुरुस्तीसाठी घेतलेले पैसे विनय अरहाना यानं पार्ट्यांवर उडवले आहे. 


रोझरी इंटरनॅशनल स्कुलची दुरुस्ती करायची आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि खेळाचं साहित्य खरेदी करायचं आहे, असं कारण देत विनय अरहानाने कॉसमॉस बॅंकेकडे 46 कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज मागितलं होतं. त्यापैकी 21 कोटी रुपये बॅंकेने रोझरी स्कुलला साहित्य पुरवणाऱ्या कंपन्या आणि रोझरी स्कुलच्या इमारतींची दुरुस्ती करून देणाऱ्या कंपनीच्या खात्यांमध्ये पाठवले. मात्र या कंपन्या अस्तित्वातच नसून अरहाना याने बनावट कागदपत्रांच्या आधारे या बनावट कंपन्या कागदोपत्री दाखवून पैसे स्वतःच्या खात्यांमध्ये वळवल्याचं ईडीच्या तपासात सामोरं आलं आहे. वर्षानुवर्षे पालक आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाऱ्या अरहाने पार्ट्यांवर हे पैसे उड़वल्याचं समोर आल्यानं पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


रोझरी इंटरनॅशनलच्या पुण्यातील कॅम्प, वारजे , कोंढवा आणि विमान नगर भागात प्री प्रायमरी ते ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. रोझरी इंटरनॅशनल स्कूलकडून या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल केली जात असल्याने पालकांनी अनेकदा आंदोलन केली. पण प्रत्येकवेळी अरहानाने शाळेत बाउन्सर आणून पालकांची आंदोलनं मोडून काढली. शाळांमध्ये बाउन्सर आणून पालक आणि विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याची एक नवी संस्कृती अरहानाने पुण्यात रुजवली आहे.


अरहानाने कॉसमॉस प्रमाणेच पिंपरी - चिंचवडच्या सेवा विकास बॅंकेकडून देखील कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतलं आहे . त्याचीही चौकशी ईडीकडून सुरु असून अरहाना बरोबरच त्याला मदत करणारे बॅंकेतील अधिकारी आणि त्याला आतापर्यंत पाठीशी घालणारे शिक्षण विभागातील कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.