पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. काही ठिकाणी पहाटेच्या अजाणवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. परंतु आज मनसेकडून राज्यात सर्वत्र मशिदींसमोर भोंगे लावण्यात येत असताना पक्षाचे नेते वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाही. उलट कालपासून ते नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे वसंत मोरे नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थित होते. 


राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर उमटला तो त्यांच्याच पक्षातील वसंत मोरे यांच्या रुपात. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. पण आजच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. कालपासून ते नॉट रिचेबल आहेत. 


राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरे यांनी शहरातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना त्यावेळी निमंत्रण नव्हतं. यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या घडामोडींनंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी (7 एप्रिल) राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीला त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यानंतर 11 एप्रिल रोजी राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची भेट झाली.


पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरे इतर पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. शिवाय वसंत मोरे यांनीही आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या